धुमाळ, चौधरी यांची तात्पुरती हकालपट्टी
By Admin | Updated: July 1, 2015 03:48 IST2015-07-01T03:48:52+5:302015-07-01T03:48:52+5:30
नगर जिल्ह्यातील शिक्षकाला महापालिकेच्या शिक्षण मंडळात बदली करून देण्यासाठी तीन लाखांची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केलेले

धुमाळ, चौधरी यांची तात्पुरती हकालपट्टी
पुणे : नगर जिल्ह्यातील शिक्षकाला महापालिकेच्या शिक्षण मंडळात बदली करून देण्यासाठी तीन लाखांची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केलेले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ आणि माजी अध्यक्ष रवींद्र चौधरी यांची राष्ट्रवादीकडून तात्पुरत्या स्वरूपात हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा आणि खासदार वंदना चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मात्र, या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी शिक्षण मंडळाचा राजीनामा देण्याबाबत कोणताही निर्णय अद्याप घेतला नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम या वेळी उपस्थित होत्या.
नगर जिल्ह्यातील एका शिक्षकाला शिक्षण मंडळात जिल्हाबाह्य बदली करून देण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिक्षण मंडळातील लिपिक संतोष मेमाणे, बाबा धुमाळ, रवींद्र चौधरी यांच्यासह आणखी एका मध्यस्थावर गुन्हा दाखल झालेला आहे. त्यानंतर मागील आठवड्यात या दोघांचीही २५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणाची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार, या दोन्ही पदाधिकाऱ्यांना पक्षातून तात्पुरत्या स्वरूपात निलंबित केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
चव्हाण म्हणाल्या, ‘‘या दोन्ही सदस्यांनी या प्रकरणाबाबत आपल्याकडे खुलासा केलेला आहे. या प्रकरणांमध्ये आपल्याला गोवण्यात आल्याचे सांगितले आहे. या सदस्यांच्या निलंबनाचा निर्णय त्यांच्यावर दाखल करण्यात येणाऱ्या आरोपपत्रातील माहितीवरून घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र, अद्याप हे आरोपपत्र मिळाले नसल्याने या दोन्ही सदस्यांचे तात्पुरते निलंबन करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. आरोपपत्र मिळाल्यानंतर कायमस्वरूपी निलंबनाचा निर्णय घेतला जाईल. या प्रकरणी धुमाळ यांनी आपल्याला पत्र लिहून यात आपला दोष नसून आपल्याला गुंतविण्याचा प्रकार झाल्याचे स्पष्ट केले आहे. ही बाब लक्षात घेऊन कोणावरही अन्याय होऊ नये म्हणून हा तात्पुरता निलंंबनाचा निर्णय घेतला आहे.
मंडळाच्या राजीनाम्याचे काय ?
-या दोन्ही सदस्यांचे निलंबन केले असल्याने त्यांचा शि़क्षण मंडळाचा राजीनामा घेणार का, याबाबत विचारणा केली असता, त्यांनी राजीनामा देण्याची गरज नसल्याचे सांगितले. याबाबतचा निर्णयही आरोपपत्र पाहिल्यानंतरच घेतला जाईल. त्यांना वाटत असेल आणि त्यांनी राजीनामा दिला, तर त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे चव्हाण म्हणाल्या. त्यामुळे पक्षाकडून केवळ तात्पुरत्या निलंबनाची कारवाई दाखवून या प्रकरणी या दोघानांही पाठीशी घालण्याचा घाट घातला जात असल्याची चर्चा महापालिकेत आहे.
पाठराखण करणे
पक्षाची जबाबदारी
-लाचखोरीच्या प्रकरणात सहभागी नसून, कोणीतरी हेतुपुरस्सर आम्हाला या प्रकरणात गुंतवले आहे़, अशी भूमिका बाबा धूमाळ व रवी चौधरी यांनी पक्षाकडे मांडली आहे़ जर कोणावर अन्याय होत असेल, तर त्याच्या पाठीशी उभे राहणे ही पक्षाची जबाबदारीच आहे असे वंदना चव्हाण यांनी या वेळी स्पष्ट केले.