मंदिरांच्या दानपेट्या फोडल्या

By Admin | Updated: December 4, 2015 02:45 IST2015-12-04T02:45:14+5:302015-12-04T02:45:14+5:30

येथील श्रीराम मंदिर व शितळादेवी मंदिराचे दरवाजे तोडून चोरट्यांनी दानपेटीतील सुमारे ४० हजार रुपये लंपास केले. गुरुवारी पहाटेच्या सुमारास झालेली चोरी सकाळी ग्रामस्थांच्या

The temple's donors were broken | मंदिरांच्या दानपेट्या फोडल्या

मंदिरांच्या दानपेट्या फोडल्या

रहाटणी : येथील श्रीराम मंदिर व शितळादेवी मंदिराचे दरवाजे तोडून चोरट्यांनी दानपेटीतील सुमारे ४० हजार रुपये लंपास केले. गुरुवारी पहाटेच्या सुमारास झालेली चोरी सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. या चोरीप्रकरणी वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. . मंदिरांमध्ये झालेल्या चोरीमुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राम मंदिराच्या तीन बाजूंनी दरवाजे आहेत. पूर्वीकडे मुख्य दरवाजा आहे. दक्षिण-उत्तर दरवाजेही आहेत. या तीनही दरवाजांना सुरक्षिततेसाठी लोखंडी दरवाजे आहेत. चोरट्यांनी उत्तरेकडील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. राम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्तींसमोर असलेल्या दोन दानपेट्या तोडून त्यातील रक्कम चोरट्यांनी पळविली. विठ्ठल-रुक्मिणी व साईबाबा मूर्तीसमोरील प्रत्येकी एक दानपेटी तोडून त्यातील रक्कमही लंपास केली. या मंदिरापासून जवळच असलेल्या शितळादेवी मंदिराचा मुख्य लोखंडी दरवाजा तोडून तेथील दानपेटीतील देखील रक्कम चोरट्यांनी चोरून नेली.
राम मंदिरात पूर्वी दोन वेळा अशाच पद्धतीने चोरीचा प्रकार घडला होता. त्यामुळे विश्वस्तांनी सुरक्षेचे उपाय म्हणून लोखंडी दरवाजे बसविले होते. तरीही तिसऱ्यांदा मंदिरात चोरी झाली. रहाटणी, काळेवाडी परिसरात सध्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. एका रात्रीत छोटी छोटी अनेक दुकाने फोडण्याचे प्रकार सुरू आहेत.
(वार्ताहर)

पोलीस गस्तीचा अभाव
पूर्वी प्रत्येक मंदिरात किंवा बाहेर पोलिसांचे व्हिजिटपुस्तक असे. रात्रपाळीचे पोलीस गस्तीच्या वेळी त्यावर स्वाक्षरी करीत असत. काही महिन्यांपासून गस्तच बंद झाली आहे . रहाटणी गावठाणात पोलीस फिरकतच नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे. गावठाण एका बाजूला असल्याने तिकडे नागरिकांची रेलचेल नसते. त्यामुळे परिसरात पुन्हा पोलिसांची रात्र गस्त सुरु करण्याची मागणी होत आहे.


मंदिराच्या सुरक्षिततेसाठी लोखंडी सेफ्टी दरवाजे लावले आहेत. लवकरच सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. मात्र त्या अगोदरच ही घटना घडली आहे.
अंकुश राजवाडे,
विश्वस्त, श्रीराम मंदिर

Web Title: The temple's donors were broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.