महिलेकडून युवकाचा खून
By Admin | Updated: January 12, 2017 02:09 IST2017-01-12T02:09:57+5:302017-01-12T02:09:57+5:30
पुणे-सातारा महामार्गावरील किकवी येथे अनैतिक संबंधांतून महिलेने युवकाचा खून केल्याची घटना काल रात्री उघडकीस आली.

महिलेकडून युवकाचा खून
नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावरील किकवी येथे अनैतिक संबंधांतून महिलेने युवकाचा खून केल्याची घटना काल रात्री उघडकीस आली. यात सचिन बापूराव जाधव (वय २९, रा. वाठार स्टेशन, कोरेगाव, सातारा, सध्या किकवी) या युवकाचा खून झाला आहे.
सचिन जाधव याला त्याच्या राहत्या घरी फिट आल्याची माहिती राणी श्रीपती मंडोत हिने भोंगवली आरोग्य केंद्रातील डॉ. मंदार सुरेश माळी यांना सोमवारी (दि. ९) रात्रीच फोनवरून सांगितली होती. त्यामुळे डॉ. माळी सचिन याला तपासण्यास किकवी येथे आले होते. त्या वेळी या युवकाला फिट आलेली नसून त्याचा गळा दाबल्याचे व त्याच्या डोक्याला इजा झाल्याचे तपासताना समजून आले. त्या वेळी त्यांनी सचिनचा संशयास्पद मृत्यू असल्याबाबत किकवी पोलिसांना माहिती दिली. त्याच वेळी सचिनबरोबर चार महिन्यांपासून राहणाऱ्या महिलेला डॉक्टरांनी पोलिसांना झालेल्या प्रकाराची माहिती दिल्याचे समजताच काही तरी कारण काढून घटनास्थळावरून तिने पलायन केले.
सचिन जाधव शिरवळ येथील प्रवीण मसाले येथे वाहनचालक म्हणून नोकरीस होता. दरम्यान, पोलिसांनी सचिनच्या नातेवाइकांना याबाबत कळविल्याचे समजते. त्या वेळी त्यांच्याकडून सचिनचे लग्नच झालेले नसल्याची बाब उघडकीस आली.
मग त्याच्याबरोबर राहणारी महिला कोण, असाही प्रश्न नातेवाइकांना पडला. याच काळात घटनास्थळाला उपविभागीय अधिकारी डॉ. वैशाली कडूकर यांनी भेट दिली. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्याचे नारायण सारंगकर व पोलीस कर्मचारी रात्री उशिरापर्यंत या घटनेचे तपास करीत होते.(वार्ताहर)