सीसीटीव्हीच्या अडचणी दूर करणार तांत्रिक समिती

By Admin | Updated: June 8, 2015 05:33 IST2015-06-08T05:33:01+5:302015-06-08T05:33:01+5:30

शहरात सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला विलंब होत असल्याने त्यातील अडचणी दूर करून त्याला गती देण्यासाठी गृहविभागाकडून तांत्रिक समितीचे गठण करण्यात आले आहे.

Technical Committee to overcome the problems of CCTV | सीसीटीव्हीच्या अडचणी दूर करणार तांत्रिक समिती

सीसीटीव्हीच्या अडचणी दूर करणार तांत्रिक समिती

पुणे : शहरात सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला विलंब होत असल्याने त्यातील अडचणी दूर करून त्याला गती देण्यासाठी गृहविभागाकडून तांत्रिक समितीचे गठण करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये पोलीस उपायुक्त, शासनाच्या आयटी विभागाचे अधिकारी, एमआरएससीचे प्रतिनिधी, एनआयसीचे प्रतिनिधी, महापालिकेच्या आयटी विभागाचा प्रतिनिधी, सीईओपीचे प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे.
जर्मन बेकरीमध्ये २०१० मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. त्यानंतर जंगली महाराज रस्ता, फरासखाना येथे झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर सीसीटीव्हीचा विषय पुन्हा चर्चेत आला होता. मात्र निविदा प्रक्रिया अनेक दिवस रखडल्याने सीसीटीव्हीचे काम सुरू होण्यास विलंब झाला होता. राज्य शासनाच्या गृह विभागाचे सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये तांत्रिक समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या चौकात सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गृह विभागाच्या नियंत्रणाखाली सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू आहे. पोलीस आयुक्तालयामध्ये सीसीटीव्हीचे नियंत्रण कक्ष असणार आहे. तेथून शहरातील महत्त्वाच्या चौकांवर लक्ष ठेवले जाणार आहे. शहरामध्ये काही ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत; मात्र अद्यापही सीसीटीव्हीचे काम मोठ्या प्रमाणात बाकी आहे. निधी तसेच इतर तांत्रिक अडचणीमुळे हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय समितीचे गठणही करण्यात आले. शहरातील संथ गतीने चालणाऱ्या कामांना गती देणे आणि त्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Technical Committee to overcome the problems of CCTV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.