प्रश्नांसंदर्भात शिक्षकांचा आंदोलनाचा इशारा
By Admin | Updated: June 21, 2015 00:02 IST2015-06-21T00:02:38+5:302015-06-21T00:02:38+5:30
जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे

प्रश्नांसंदर्भात शिक्षकांचा आंदोलनाचा इशारा
लेण्याद्री : जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. तातडीने प्रश्न न सोडविल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनात म्हणले आहे की, पुणे जिल्हा परिषदेने ३१ मार्च २०१५ रोजी जुन्नर तालुक्यातील १०० प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीस मंजुरी दिली होती. परंतु, अद्यापही वारंवार विनंती करूनही सदर शिक्षकांची प्रशासनाकडून वेतन निश्चिती झालेली नाही. या दिरंगाईमुळे सदर शिक्षकांचे आर्थिक नुकसान होत आहे.
गेले अनेक महिने जुन्नर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे पगार उशिराने होत आहेत. पगारासाठी एम.टी.आर उपलब्ध होऊनही अर्थ विभाग व शिक्षण विभाग यांच्यात समन्वय नसल्याने रक्कम उपलब्ध असूनही पगार वेळेवर होत नाहीत. परिणामी शिक्षकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. यामुळे गृहकर्ज हप्ते, आयुर्विमा भत्ता, शिक्षक सोसायटी हप्ता, फंड आदी वेळेवर जमा होत नसल्याने विनाकारण जादा व्याज व दंड भरावा लागत आहे, त्याचा फटका शिक्षकांना बसत आहे. या वेळी जिल्हा शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे, शिक्षक नेते विनायक ढोले, तालुकाध्यक्ष रवींद्र वाजगे, कार्याध्यक्ष उपेंद्र डुंबरे, पतसंस्थेचे सरचिटणीस विजय लोखंडे, वैभव सदाकाळ, संतोष पाडेकर, विश्वनाथ नलावडे, भरत बोचरे, देवराम गवारी आदी
उपस्थित होते. (वार्ताहर)