शिक्षकांना मिळेना निवडणूक कामाचे मानधन
By Admin | Updated: March 23, 2017 04:11 IST2017-03-23T04:11:52+5:302017-03-23T04:11:52+5:30
मतदान होऊन एक महिना उलटला, निवडून आलेल्यांनी पदभारही घेतला. परंतु निवडणूकप्रक्रिया सुरळीत पार पडावी, म्हणून ज्या

शिक्षकांना मिळेना निवडणूक कामाचे मानधन
आंबेठाण : मतदान होऊन एक महिना उलटला, निवडून आलेल्यांनी पदभारही घेतला. परंतु निवडणूकप्रक्रिया सुरळीत पार पडावी, म्हणून ज्या कर्मचाऱ्यांनी काम केले, त्यांना मात्र मानधनासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरे झिजविण्याची वेळ आली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका २१ फेब्रुवारी २०१७ रोजी झाल्या. एक महिना उलटला तरी निवडणूक कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण व निवडणूक कामाचा भत्ता अद्यापही खेड तालुक्यात अदा करण्यात आला नसल्याची परिस्थिती आहे.
यापूर्वीच्या निवडणुकामध्ये हा भत्ता निवडणुकीच्या दिवशीच रोख स्वरुपात दिला जात असे. सर्व कर्मचाऱ्यांचे खाते नंबर निवडणुकीच्या आधी घेतले होते. त्यामुळे आॅनलाइन पद्धतीने प्रत्येकाच्या खात्यात मानधन जमा होणे अपेक्षित होते. परंतु ते जमा झाले नाही.
हे निवडणूक मानधन विनाविलंब मिळावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा खेड यांनी तहसीलदार सुनील जोशी यांना लेखी निवेदन देऊन केली आहे.
या वेळी संघटनेचे राज्याध्यक्ष दत्तात्रय सावंत, जिल्हा सरचिटणीस नामदेव गायकवाड, अध्यक्ष शांताराम नेहेरे, सरचिटणीस नारायण करपे, जालिंदर दिघे, विलास पवळे, दत्तात्रय भालचिम उपस्थित होते.(वार्ताहर)