वेतनासाठी शिक्षकांचा मोर्चा
By Admin | Updated: March 23, 2017 04:36 IST2017-03-23T04:36:15+5:302017-03-23T04:36:15+5:30
विशेष शिक्षकांचे तत्काळ समायोजन करावे, ४ ते ५ वर्षांपासूनचे थकीत वेतन त्वरित द्यावे; तसेच वैयक्तिक मान्यता रद्द केलेल्या विशेष

वेतनासाठी शिक्षकांचा मोर्चा
पुणे : विशेष शिक्षकांचे तत्काळ समायोजन करावे, ४ ते ५ वर्षांपासूनचे थकीत वेतन त्वरित द्यावे; तसेच वैयक्तिक मान्यता रद्द केलेल्या विशेष शिक्षक व शिपाई पदावरील सेवकांना पुनर्रस्थापित करावे, आदी मागण्यांसाठी राज्य भरातील विशेष शिक्षकांनी बुधवारी प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयासमोर आंदोलन केले; तसेच सर्व मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.
राज्याच्या शासनातर्फे करण्यात आलेल्या पट पडताळणीनंतर अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यातील काही शिक्षकांचे समायोजन करण्यात आले आहे; मात्र विशेष विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न प्रलंबित आहे. राज्यातील सुमारे ५०० ते ५५० शिक्षकांनी शिक्षण संचालक कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. कोल्हापूरचे आमदार डॉ. सुजित मिनचेकर यांनी शिक्षकांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले; तसेच प्राथमिक शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांच्याशी विशेष शिक्षकांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. आंदोलनामुळे पदावरून कमी करण्यात आलेल्या शिक्षकांना पुनर्रप्रस्थापित करण्याचे आश्वासन नांदेडे यांनी दिले, असे शिक्षकांनी सांगितले. (प्रतिनिधी)