शिक्षिकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन फेटे बांधून गुलाबपुष्प देऊन केले स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:08 IST2021-06-17T04:08:35+5:302021-06-17T04:08:35+5:30
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे शाळा प्रत्यक्षात सुरु करणे शक्य नसल्याने जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरु होत आहेत. ...

शिक्षिकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन फेटे बांधून गुलाबपुष्प देऊन केले स्वागत
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे शाळा प्रत्यक्षात सुरु करणे शक्य नसल्याने जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरु होत आहेत. दरवर्षी नवीन शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्याच दिवशी इ. पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत वाजतगाजत, विविध उपक्रमांद्वारे केले जात असे. परंतु ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरु झाल्याने अमरापूर शाळेतील शिक्षिकांनी नवीन विद्यार्थ्यांना गुगल फॉर्मद्वारे दाखल करून घेऊन आज प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन कोविड शासकीय नियमांचे पालन करीत विद्यार्थ्यांना फेटे बांधून शैक्षणिक साहित्य, खाऊ, गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाकण्यासाठी गुगल क्लास, झूम ॲप, दीक्षा ॲप, दूरदर्शन, शैक्षणिक विडिओ लिंक या साधनांची माहिती पालकांना देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अध्यापन तयारीबाबत जागृती करण्यात आली.
ज्या विद्यार्थ्याकडे ऑनलाईन सुविधा नाहीत, अशा विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने गृहभेटी कृतिपत्रिका, स्वाध्यायपुस्तिका याद्वारे त्यांना अध्ययन प्रवाहात सहभागी करून घेणार असल्याची माहिती मुख्याध्यापिका विनिता शिंदे यांनी दिली. नवागतांचे नियोजन स्वागत व कार्यवाही उषा टाकळकर, सरिता भालचिम, सविता जोशी यांनी केली. पालकांनी व ग्रामस्थांनी शिक्षकांचे स्वागत केले. या वेळी अंबादास चौगुले, रमेश चौगुले यांच्या उपस्थितीत महादेवनगर, खोरेवस्ती, आगर पेठ, अमरापूर व वीटभट्टीवरील मजुरांच्या मुलांना प्रवेशित करून स्वागत करण्यात आले. शैक्षणिक वर्षाच्या उपक्रमांसाठी गट शिक्षणाधिकारी खोडदे ,विस्ताराधिकारी अनिता
शिंदे , केंद्रप्रमुख बांगर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
अमरापूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना फेटे बांधले आणि शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप करीत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.