शिक्षकांना व्हायचंय लिपिक
By Admin | Updated: January 28, 2015 02:35 IST2015-01-28T02:35:49+5:302015-01-28T02:35:49+5:30
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २०१०पासून डीएड सीईटी परीक्षा घेतली जात नाही. त्यामुळे गेल्या ४ वर्षांत डीएड पदवी घेऊन बाहेर पडलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी वणवण

शिक्षकांना व्हायचंय लिपिक
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २०१०पासून डीएड सीईटी परीक्षा घेतली जात नाही. त्यामुळे गेल्या ४ वर्षांत डीएड पदवी घेऊन बाहेर पडलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी वणवण भटकावे लागत आहे. परंतु, शिक्षकाची नोकरी नाही, तर किमान लिपिकाची तरी नोकरी मिळावी म्हणून हे उमेदवार आता टायपिंग परीक्षेकडे वळले आहेत. परिणामी, परीक्षा परिषदेतर्फे नोव्हेंबर २०१४ घेण्यात आलेल्या टायपिंगच्या परीक्षेस अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या तब्बल ३ लाख ४८ हजारांवर पोहोचली आहे.
परीक्षा परिषदेतर्फे १९९९मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेला १ लाख ४६ विद्यार्थी ४०३ विद्यार्थी बसले होते. त्यातील ९० हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. या परीक्षेचा शेकडा निकाल ५३.४८ टक्के लागला होता. परंतु, शासकीय भरती प्रक्रिया बंद झाल्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ४१ हजारांपर्यंत खाली आली होती. तसेच ज्या वेळी शासनाकडून भरतीवरील बंदी उठविली जाते. त्यानंतर त्वरितच या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते, असे गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यातच काही वर्षांपासून दर वर्षी डीएड आणि बीएड पदवी घेऊन लाखो विद्यार्थी महाविद्यालयातून बाहेर पडत आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी शासकीय व खासगी कंपन्यांमध्ये लिपिकपदाची नोकरी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच २०१२पासून दर वर्षी २ लाखांहून अधिक विद्यार्थी टायपिंगची परीक्षा देत असल्याचे दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)