‘लक्ष्य २०१७’ गवगवा करणारे थंडावले
By Admin | Updated: November 14, 2016 03:01 IST2016-11-14T03:01:09+5:302016-11-14T03:01:09+5:30
‘लक्ष्य २०१७’ गवगवा करणारे थंडावले

‘लक्ष्य २०१७’ गवगवा करणारे थंडावले
पिंपरी : महापालिका निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेवली आहे. इच्छुकांनी नगरसेवक होण्याची स्वप्ने बाळगून महापालिका निवडणूक २०१७ असा गवगवा सुरू केला होता. काळ्या पैशाला पायबंद घालण्यासाठी हजार, पाचशेच्या नोटा चलनातून रद्द केल्याचा केंद्र शासनाचा निर्णय जाहीर झाला. सर्वांची धावपळ उडाली. नोटा बदलून घेण्यासाठी आणि खर्चासाठी सुटे पैसे मिळविण्यासाठी बँकांपुढे लांबच लांब रांगा लागल्याचे दृश्य पाहावयास मिळू लागली. या परिस्थितीत लक्ष २०१७ असा गवगवा करणारे थंडावले असून, केवळ सोशल मीडियावरच त्यांचे अस्तित्व जाणवू लागले आहे.
महापालिका निवडणूक जवळ आल्याने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, विविध उपक्रम, तसेच मतदारांना आकर्षित करण्याच्या विविध योजना इच्छुकांनी आखल्या होत्या. निवडणुका पैशांवरच लढल्या जातात, हे सूत्र उमगले असल्याने इच्छुकांनी तशी तयारी ठेवली होती. फेरप्रभागरचना झाल्यानंतर पूर्वीचा १० ते १२ हजार मतदार संख्येचा प्रभाग आता ५० हजार मतदार संख्येचा झाला आहे. मिनी विधानसभा मतदारसंघाच्या स्वरूपातील प्रभागात ५० हजार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध पातळीवर खर्च करावा लागणारच, हे समीकरण लक्षात घेऊन निधी उभारण्याच्या हालचाली सुरू होत्या. निधीची तरतूद करण्याचे काहींचे काम अंतिम टप्प्यात आले असताना, अचानक हजार, पाचशेच्या नोटा चलनातून रद्दचा निर्णय झाला. त्यातच आपल्याकडील सर्व पुंजी बँक खात्यात जमा करणे अनिवार्य झाले. त्यामुळे इच्छुकांची जाहिरातबाजी थांबली आहे.
ज्यांचे वॉर्डात काम आहे, परंतु निवडणुकीसाठी खर्च करण्याची ऐपत नाही, अशांना आगामी निवडणूक कशी लढायची? पैसेवाल्यांपुढे आपला टिकाव लागणार का? अशी त्यांच्या मनात चिंता होती. पैसेवाल्यांना या निवडणुकीत हवा तसा पैसा वापरता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने ज्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांनीही निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे. पैशांअभावी त्यांना फ्लेक्सबाजी करता आली नसली, तरी खऱ्या अर्थाने त्यांचा मतदारांशी संपर्क आहे. (प्रतिनिधी)