टँकरला जीपीएस, पण नियंत्रणच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2015 04:30 IST2015-09-09T04:30:31+5:302015-09-09T04:30:31+5:30

शहरातील पाण्याच्या टँकरचालकांकडून होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने सर्व टँकरना ग्लोबल पोजिशनिंग सिस्टिम (जीपीएस) बसवून घेतली.

The tanker has GPS, but it does not have control | टँकरला जीपीएस, पण नियंत्रणच नाही

टँकरला जीपीएस, पण नियंत्रणच नाही

पुणे : शहरातील पाण्याच्या टँकरचालकांकडून होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने सर्व टँकरना ग्लोबल पोजिशनिंग सिस्टिम (जीपीएस) बसवून घेतली. मात्र, प्रत्यक्षात या टँकरवर नियंत्रण ठेवण्यासाठीची यंत्रणाच उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे ऐन पाणीटंचाई काळातही टँकरचालकांकडून होत असलेल्या गैरप्रकारांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
शहरामध्ये महापालिकेकडून टँकरचालकांना पाणी उपलब्ध करून दिले जाते. कमी दाबाने पाणीपुरवठा होणाऱ्या भागांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी टँकर पुरविले जातात. मात्र, टँकरचालकांकडून बांधकाम व्यावसायिकांना टँकर विकणे, हद्दीबाहेर नेऊन पाण्याची विक्री करणे असे प्रकार घडत असल्याचे वारंवार उजेडात आले होते. यावर मार्ग काढण्यासाठी सर्व टँकरना जीपीएस बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.
मे २०१५ पर्यंत महापालिकेच्या व खासगी ठेकेदारांच्या सर्व टँकरना जीपीएस यंत्रणा बसविली गेली आहे.
टँकरला आखून दिलेल्या मार्गाव्यतिरिक्त तो दुसऱ्या ठिकाणी गेल्यास जीपीएसद्वारे त्याची माहिती लगेच नियंत्रण कक्षाला मिळेल, अशी त्यामागची व्यवस्था होती.
मात्र, प्रत्यक्षात त्याकरिता मॉनिटरिंग व्यवस्थाच न उभारल्याने जीपीएस उभारूनही टँकरचालकांकडून होत असलेल्या गैरप्रकारांवर लक्ष ठेवता येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे टँकरचालकांचे चांगलेच फावत आहे.
शहरात सात ठिकाणी महापालिकेची टँकर भरून देण्याची व्यवस्था आहे. जीपीएस बसविण्याचे परिपत्रक २०१२ मध्ये प्रशासनाने काढले.
त्यानंतर मे २०१३ मध्ये याला मुख्य सभेने मान्यता दिली. त्यालाही टँकरचालकांच्या लॉबीकडून विरोध झाल्याने अनेक दिवस हा प्रस्ताव रेंगाळला होता. अखेर मे २०१५ मध्ये सर्व टँकरला जीपीएस बसले आहेत. महापालिकेचे ५० व खासगी व्यावसायिकांचे १५० असे २०० पाण्याचे टँकर पुण्यात आलेत.
समाधानकारक पाऊस न झाल्याने आॅगस्ट महिन्यात टँकरच्या १४ हजार १६७ फेऱ्या झाल्या आहेत. वस्तुत: दर वर्षी पावसाळ्यामध्ये टॅँकरची संख्या घटत असते. यंदा त्यामध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या १२ हजार ५८६ इतकी होती.

Web Title: The tanker has GPS, but it does not have control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.