आदिवासी पट्ट्यात पावसाळ््यातही टँकरची मागणी
By Admin | Updated: June 20, 2017 07:15 IST2017-06-20T07:15:48+5:302017-06-20T07:15:48+5:30
आदिवासी भागातील जलस्रोतांमध्ये पाण्याचा थेंबही राहिला नाही, तर दुसरीकडे पावसाने या भागामध्ये पडण्यासाठी धरलेला अट्टहास

आदिवासी पट्ट्यात पावसाळ््यातही टँकरची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेघर : एकीकडे आदिवासी भागातील जलस्रोतांमध्ये पाण्याचा थेंबही राहिला नाही, तर दुसरीकडे पावसाने या भागामध्ये पडण्यासाठी धरलेला अट्टहास यामुळे आदिवासी जनतेला मोठ्या प्रमाणात दुष्काळाशी सामना करावा लागत आहे.
ऐन पावसाळा सुरू होऊनही वरुणराजाच्या अवकृपेमुळे आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील आदिवासी जनतेला हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग हा मुसळधार पडणाऱ्या पावसाचे माहेरघर समजला जातो. पावसाळ््यातील चार महिने या भागामध्ये मुसळधार पाऊस पडतो; परंतु या भागाचे दुर्भाग्य असे उन्हाळ््यामध्ये या भागातील आदिवासी जनतेला पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागते. या भागात काढण्यात आलेल्या शिवकालीन खडकातील टाक्या, बुडीत बंधारे, विहिरी, कूपनलिकांमध्ये पाण्याचा खडखडाट झाला आहे. आदिवासी महिलांना पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. या भागातील जलस्रोतांमध्ये पाण्याचा खडखडाट झाल्यामुळे या भागातील आदिवासी जनतेला टॅँकरचा आधार घ्यावा लागत आहे़ या भागामध्ये असणारे तुरळक पिण्याच्या पाण्याच्या साठ्यातील पाणी दूषित झाल्यामुळे साथीच्या रोगांनी मोठ्या प्रमाणात जोर धरला आहे. जुलाब, उलट्या, बॅक्टेरिया, मलेरिया, अंगाला खाज येणे यांसारखे आजार या भागामध्ये मोठ्या प्रमाणात बळावले असून, या भागातील सरकारी व खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. जसजसे पावसाळा लांबणीवर पडत आहे तसतसे आदिवासी बांधवांचे पाण्याविषयी हाल होत आहेत.