सर्दी, तापावरही टॅमिफ्लूचा मारा

By Admin | Updated: March 5, 2015 00:37 IST2015-03-05T00:37:32+5:302015-03-05T00:37:32+5:30

स्वाइन फ्लूमुळे शहरात ११ जणांचे बळी गेले आहेत. तसेच सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. हे रुग्ण धास्तीपोटी डॉक्टरांकडे टॅमिफ्लू गोळ्यांची मागणी करीत आहेत.

Tamiflu hit the winters, cold | सर्दी, तापावरही टॅमिफ्लूचा मारा

सर्दी, तापावरही टॅमिफ्लूचा मारा

पिंपरी : स्वाइन फ्लूमुळे शहरात ११ जणांचे बळी गेले आहेत. तसेच सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. हे रुग्ण धास्तीपोटी डॉक्टरांकडे टॅमिफ्लू गोळ्यांची मागणी करीत आहेत. डॉक्टरही त्यांना त्या गोळ्या लिहून देत आहेत. शहरातील तीन खासगी औषध दुकानामध्ये या गोळ्या मिळतात. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात टॅमिफ्लू गोळ्या हव्या असतील, तर रुग्णांना रुग्णालयात आणणे बंधनकारक केले आहे, काही जणांना गरज नाही, म्हणून टॅमिफ्लूच्या गोळ्या दिल्या जात नाहीत. त्यामुळे रुग्णांमध्ये संभ्रमावस्था झाली आहे.
एक डॉक्टर सांगतात, गोळ्या घ्या आणि दुसरे डॉक्टर गोळ्या घेण्याची गरज नाही, असे सांगतात. त्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक चिंतेत आहेत. त्यामुळे त्यांची धावपळ होऊन ^त्रास सहन करावा लागत आहे. स्वाइन फ्लूची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येत असतील, तर टॅमिफ्लू गोळ्या घेण्याची गरज आहे. साधा फ्लू असेल, तर त्यासाठी या गोळ्या खाण्याची गरज पडत नाही, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्वाइन फ्लूच्या आजाराने सलग तीन दिवस ३ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे साध्या फ्लूचा आजार असणाऱ्यांनीही धास्ती घेतली आहे. त्यामुळे टॅमिफ्लू गोळ्यांचा तुटवडा जाणवत आहे.
साप्ताहिक सुट्या रद्द
शहरातील महापालिकेच्या सर्व रुग्णालय व दवाखान्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक व साप्ताहिक सुट्या रद्द करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी बुधवारी दिले. सुटीवर असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांनाही हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी स्वाइन फ्लूचा आढावा घेण्यासाठी औंध जिल्हा रुग्णालयात बैठक आयोजित केली होती. त्या वेळी त्यांनी विविध सूचना केल्या. (प्रतिनिधी)

४महापालिकेकडे सध्या १० हजार गोळ्या शिल्लक आहेत. रुग्णांना स्वाइन फ्लूची लक्षणे दिसून आली, तर त्यांना चव्हाण रुग्णालयात दाखल करून घेतले जाते, असे डॉ. अनिल रॉय यांनी सांगितले.

खासगी डॉक्टरांकडून काही रुग्ण गोळ्या घेण्यासाठी येतात. त्यांची फेरतपासणी करण्यात येते. स्वाइन फ्लूची लक्षणे दिसल्यास गोळ्या देण्यात येतात. सध्या शहरामध्ये अनेक ठिकाणी गोळ्या उपलब्ध झाल्या आहेत. त्या ठिकाणाहून या गोळ्या खरेदी करणे आवश्यक आहे.
- डॉ. अनिल रॉय, मुख्य वैद्यकीय अधिकारी

शहरामध्ये फ्लूचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे नागरिक घाबरलेले आहेत. तपासणी केल्यानंतर लक्षणांची तीव्रता पाहून गोळ्या देण्यात येत आहे. जास्तीत जास्त रुग्ण हे फ्लूसबंधीचे आहेत.
- डॉ. ए. एस. गोसावी

जास्तीत जास्त रुग्ण सर्दी, ताप, खोकला या आजारांचे येत आहेत. त्यांच्यामध्ये लक्षणांची तीव्रता दिसली, तर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात येते.
- डॉ. प्रवीण आव्हाड

पालिकेतर्फे तपासणी सुरू
४शहरात ज्या भागात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. त्या भागात तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक नियुक्त केले आहे. घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोशीतील महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू

स्वाइन फ्लूमुळे शैलेजा दिनकर माने (वय ४५ रा. स्पाइन रस्ता, मोशी) यांचा चिंचवड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी मुत्यू झाला. त्यांना १६ फेब्रुवारीला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना तीन ते चार दिवस आधी ताप येत होता.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची
प्रकृती अधिक खालावली. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या
थुंकीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले
होते. त्याचा अहवाल ४ दिवसांनी रुग्णालयाला प्राप्त झाला होता. त्यामध्ये त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले होते.
शहरात स्वाइन फ्लू झालेले नवे १५ रुग्ण आढळून आले आहेत, तर ४६ जणांच्या थुंकीचे नमुने तापसणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येमध्ये दररोज वाढ होत आहे. ५ हजार ३१६ तपासणीसाठी रुग्णालयात आले होते. त्यामध्ये एक हजार २३१ जणांना सर्दी, खोकला असे आजार आढळून आले. त्यातील २९१ जणांना टॅमिफ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत.
शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत ४२ जण उपचार घेत आहेत. शहरात थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे स्वाइन फ्लूच्या विषाणूंना पोषक वातावरण मिळत आहे. त्यामुळे महापालिकेच्या उपाययोजना कमी पडत आहेत.

Web Title: Tamiflu hit the winters, cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.