तेल्याभुत्याच्या कावडीची उभारणी
By Admin | Updated: March 28, 2017 23:48 IST2017-03-28T23:48:31+5:302017-03-28T23:48:31+5:30
दक्षिण भारताचे कैलास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथे होणाऱ्या यात्रेसाठी शेकडो वर्षांच्या

तेल्याभुत्याच्या कावडीची उभारणी
खळद : दक्षिण भारताचे कैलास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर येथे होणाऱ्या यात्रेसाठी शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार पायी वारीने जाण्यासाठी पंचक्रोशीच्या संत तेल्याभुत्याच्या कावडीची आज गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी संत निवृत्तीमहाराज खळदकर यांच्या मार्गदर्शनाखाली एखतपूर येथे उभारणी करण्यात आली.
खळद, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, कुंभारवळण या पंचक्रोशीची संत तेल्याभुत्याची कावड परंपरेनुसार शिखर शिंगणापूर यात्रेसाठी पायी वारीने रामनवमीच्या दिवशी प्रस्थान करणार आहे. यानिमित्ताने आज गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी पंचक्रोशीतील भाविकांच्या उपस्थितीत कावडीची उभारणी करण्यात आली.
या वेळी कावडीची एखतपूर-मुंजवडी येथे रंगाची उधळण करीत ढोल-ताशांच्या गजरात भव्य ग्राममिरवणूक काढण्यात आली. यानंतर येथील भैरवनाथ मंदिरात पंचक्रोशीच्या भाविकांची बैठक झाली.
या वेळी पायी वारीबाबत सातारा व सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने शिखर शिंगणापूर येथे घेण्यात आलेल्या बैठकीचा वृत्तांत एखतपूर मुंजवडीचे माजी सरपंच रामभाऊ झुरंगे, माजी उपसभापती देविदास कामथे यांनी सांगितला. या वेळी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप, नीरा बाजार समितीचे सभापती नंदकुमार जगताप, जोगवडीकर ग्रामस्थ यांनी भेट दिली.
या वेळी जि. प. सदस्य दत्ता झुरंगे, खळदचे माजी सरपंच कैलास कामथे यांनीही मार्गदर्शन करीत यात्रा शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले. यंदा यात्रेत कावडीची जबाबदारी खळद गावावर असून कावडीची सेवा करण्यासाठी १४ बैलगाडीधारकांच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. यामध्ये येथील आबासो कृष्णा कामथे यांच्या बैलगाडीला कावडीची सेवा करण्याचा मान मिळाला आहे. त्यांचा सन्मान महाराजांच्या हस्ते करण्यात आला.
आजपासून भाविक यात्रेच्या तयारीला लागतात. यादरम्यान आपल्या बैलगाड्यांना दट्या बसविणे, त्यावर यात्राकाळात पुरेल एवढी वैरण बांधणे, बैलांच्या पायाला पत्रा बसविणे, वाहनांना पाण्याच्या टाक्या बसविणे, यात्रेदरम्यान जेवणाची व्यवस्था करणे आदी कामे करतात.
रामनवमीच्या पूर्वसंध्येला संत तेल्याभुत्याच्या जळत्या घराच्या जागेला, तेलाच्या घाण्याला कावड भव्य मिरवणुकीने प्रदक्षिणा घालते व पुन्हा येथे पंचक्रोशीची बैठक होऊन तयारीचा आढावा घेतला जातो. रामनवमीच्या दिवशी ४ एप्रिल रोजी सायं. चार वाजता एखतपूर येथे समाधीस्थळाला प्रदक्षिणा घालीत खळद येथे शाही मिरवणुकीने कावड प्रस्थान करील.(वार्ताहर)