तळेगाव-चाकण रस्ता; रुंदीकरणाचे आश्वासन
By Admin | Updated: June 17, 2015 23:22 IST2015-06-17T23:22:40+5:302015-06-17T23:22:40+5:30
आयआरबीचा टोलनाका बंद झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा तळेगाव-चाकण राज्यमार्गावरील रस्त्याच्या विकासाबाबत

तळेगाव-चाकण रस्ता; रुंदीकरणाचे आश्वासन
तळेगाव दाभाडे : आयआरबीचा टोलनाका बंद झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा तळेगाव-चाकण राज्यमार्गावरील रस्त्याच्या विकासाबाबत स्वतंत्र निर्णय घ्यायचा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबतचा अहवाल मुख्य अभियंता डी. वाय. पाटील यांच्याकडे येत्या दोन-चार दिवसांत पाठविला जाईल. मंजुरी मिळताच स्टेशन चौकातून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा दहा फूट रुंदीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, असे आश्वासन पीडब्ल्यूडीच्या विभागीय अधिकाऱ्यांनी आज दिले.
चाकण मार्गावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात लीना नीलेश वाडेकर या ३२ वर्षीय महिलेला प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर येथील सर्व पक्षांचे कार्यकर्ते, संघटनांचे पदाधिकारी यांनी रस्त्याच्या धोकादायक स्थितीवर उपाययोजना करण्यासाठी मंगळवारी हनुमान मंदिरातील बैठकीत चर्चा केली. आंदोलनाऐवजी त्यांनी पीडब्लूडी आणि पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानुसार बुधवारी अभियंता डोंगरे, कोरडे आणि सौ. जठार यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमवेत इंद्रायणी महाविद्यालय ते वडगाव मावळ फाट्यापर्यंतच्या तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याची पाहणी केली.
या वेळी नगराध्यक्षा सुलोचना आवारे, मावळ मित्र जनआंदोलन समितीचे अध्यक्ष सुशील सैंदाणे, सभागृह नेते गणेश खांडगे, नगरसेवक गणेश भेगडे, गणेश काकडे, माजी नगराध्यक्ष राजू जांभूळकर तळेगाव-चाकण राज्यमार्ग कृती समितीचे अध्यक्ष सुरेश चौधरी, व्यापारी असोसिएशनचे किरण ओसवाल, श्रीराम कुबेर आदींनी अधिकाऱ्यांना माहिती दिली. चौकातील अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या सिक्स सीटर्स आणि इतर वाहनांचे रस्त्यावरील अतिक्रमण केलेले अनधिकृत थांबे, अडथळा ठरणारी अतिक्रमणे आणि बसथांबा पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांच्या निदर्शनास आणून दिली. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या गोष्टींना हटविण्यासाठी योग्य कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन बाबर यांनी दिले.