तळीराम, रोमिओंवर कारवाई करणार
By Admin | Updated: February 2, 2015 23:21 IST2015-02-02T23:21:33+5:302015-02-02T23:21:33+5:30
नाथाचीवाडी व लडकतवाडी या गावांमधील ग्रामदेवतांचे यात्रा उत्सव सुरळीत पार पडावेत, यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

तळीराम, रोमिओंवर कारवाई करणार
यवत : यवत, पारगाव (सा. मा.), नाथाचीवाडी व लडकतवाडी या गावांमधील ग्रामदेवतांचे यात्रा उत्सव सुरळीत पार पडावेत, यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. हुल्लडबाजी व भांडणे करणाऱ्यांना पोलिसी खाक्या दाखविणार असल्याचा इशारा यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र्र पाटील यांनी दिला आहे.
यवत येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सव दि. ३ व ४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यानिमित्त यवत ग्रामस्थांनी पाटील यांची भेट घेऊन पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली.
या वेळी भीमा-पाटस कारखान्याचे संचालक सुरेश शेळके, श्री काळभैरवनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष नानासाहेब दोरगे, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष शंकर दोरगे, शिवसेनेचे शाखा अध्यक्ष श्रीपती दोरगे, दत्तात्रय दोरगे, बापू दोरगे, पोलीस उपनिरीक्षक सुशांत किनगे आदी उपस्थित होते.
यात्रेच्या काळात विशेष करून देवांचा छबिना, तमाशा, कुस्त्यांचा आखाडा व पाळणे असलेल्या भागात बंदोबस्त देण्याची मागणी केली. तमाशा व पाळणे असलेल्या ठिकाणी काही तळीराम व रोमिओ गोंधळ घालत असतात. यामुळे विनाकारण भांडणे व मारामारी घडून यात्रा उत्सवात गालबोट लागते. याकडे लक्ष देण्याची मागणी यवत ग्रामस्थांनी केली.
या वेळी पाटील यांनी, यवतसह परिसरातील नाथाचीवाडी, लडकतवाडी व पारगाव (सा. मा.) या गावातील ग्राम दैवतांचा उत्सव दि.१ ते ४ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. यामुळे यवत पोलीस सतर्क आहेत. यात्रा काळात विशेष करून तळीराम मंडळी जोमात असतात. त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवणार आहे. गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलीस लक्ष ठेवणार आहेत. तसेच गर्दीचा फायदा घेऊन यात्रा काळात महिलांचे दागिने चोरीचे प्रकार घडत असतात. यासाठी महिलांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. महिलांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी महिला पोलीस देखील बंदोबस्तासाठी उपस्थित असतील. येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सव दि. ३ पासून सुरू होत आहे.
यवत : येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सव उद्यापासून (दि. ३) सुरू होत आहे. यानिमित्त ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे. परंपरागत पद्धतीने दरवर्षी माघ महिन्यातील पौर्णिमेला हा यात्रोत्सव साजरा केला जातो.
मंगळवार (दि.३) व बुधवार (दि.४) रोजी श्री काळभैरवनाथ व श्री महालक्ष्मी मातेचा उत्सव गावात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
४मंगळवार (दि.३) रोजी सकाळी ५ ते ६ श्री नाथांची महापूजा, सकाळी ६ ते ९ देवाला पाणी घालणे, सकाळी ९ ते ११ देवाचा पोषाख, ११ ते ६ दंडवत व नैवेद्य, सायंकाळी ६ ते ८ काठ्यांची सवाद्य मिरवणूक होणार आहे. रात्री छबीना व भिका भीमा सांगवीकर यांचा लोकनाट्याचा तमाशा होणार आहे.
४बुधवार (दि.४) सकाळी ८ ते १ भिका भीमा सांगवीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी ४ वाजता नामवंत पहिलवानांच्या कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगणार आहे. रात्री कै. तुकाराम खेडेकरसह पांडुरंग मुळे, मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशा होईल अशी माहिती ग्रामस्थ मंडळ व महालक्ष्मी माता प्रतिष्ठान, यवत यांच्या वतीने देण्यात आली.