बंडखोरी टाळण्याची दक्षता घ्या
By Admin | Updated: January 24, 2017 02:55 IST2017-01-24T02:55:31+5:302017-01-24T02:55:43+5:30
आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाकडे इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे. एका प्रभागामध्ये केवळ चौघांनाच तिकीट मिळू

बंडखोरी टाळण्याची दक्षता घ्या
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाकडे इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे. एका प्रभागामध्ये केवळ चौघांनाच तिकीट मिळू शकणार आहे. उर्वरित इच्छुकांकडून ऐन निवडणुकीच्या काळात बंडखोरी होणार नाही याची तयारी आतापासूनच करा. इच्छुकांच्या बैठका घ्या, कमी दिवस राहिले आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर यासाठी वेळ घालविता येणार नाही आदी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील कोअर कमिटीच्या सदस्यांना केल्या.
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त फडणवीस सोमवारी पुण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी दुपारी अडीच वाजता पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली. या वेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार विजय काळे, भीमराव तापकीर, मेधा कुलकर्णी, जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, गटनेते गणेश बिडकर, सरचिटणीस उज्ज्वल केसकर उपस्थित होते.
पुणे महापालिकेमध्ये परिवर्तन घडवून आणून भाजपाची सत्ता आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही महिन्यांपासून विशेष लक्ष घातले आहे. भाजपाला बळ देण्यासाठी इतर पक्षांमधून आजी-माजी नगरसेवकांना मुख्यमंत्र्यांकडून प्रवेश दिला जात आहे. निवडणुकीच्या दैनंदिन घडामोडींवर मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत. सोमवारच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे, याची माहिती जाणून घेतली. प्रत्येकाला बोलण्याची संधी देऊन त्यांना त्यांची मते सांगण्यात आली. प्रत्येकाचे म्हणणे मुख्यमंत्र्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतले.
पक्षाकडून सर्व प्रभागांचा सर्व्हे करण्यात आला आहे, त्यामुळे कुठल्या प्रभागात पक्षाची किती ताकद आहे, याची माहिती उपलब्ध झाली आहे. सर्व्हेनुसार जिथे पक्ष कमी पडत आहे, तिथे जास्त लक्ष दिले जावे. शासनाकडून मेट्रो, विकास आराखडा, जायका प्रकल्प आदी पुण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. ते लोकांपर्यंत पोहोचवावे, आदी सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणत्या नेत्यांच्या सभा हव्या आहेत, त्याची माहिती शहर कार्यालयाकडे द्यावी. त्यानुसार नेत्यांच्या सभांचे नियोजन केले जाईल, असे रावसाहेब दानवे यांनी या वेळी सांगितले. पक्षाकडून मदतीची कुठेही आवश्यकता असल्याचे सांगा, त्यानुसार सर्वतोपरी मदत केली जाईल असे विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.