शिपाईपदाची परीक्षा नव्याने घेणार

By Admin | Updated: November 30, 2015 02:00 IST2015-11-30T02:00:56+5:302015-11-30T02:00:56+5:30

जिल्हा परिषदेच्याच कर्मचाऱ्याने एका सेंटरवर जाऊन पेपर स्कॅन केल्याचा संशय आल्याने या पदाची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला

Take the new test for the sepidestep post | शिपाईपदाची परीक्षा नव्याने घेणार

शिपाईपदाची परीक्षा नव्याने घेणार

पुणे : जिल्हा परिषदेच्याच कर्मचाऱ्याने एका सेंटरवर जाऊन पेपर स्कॅन केल्याचा संशय आल्याने या पदाची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी सांगितले.
१८५ जागांसाठी ३८ हजार ३0४ अर्ज आले होते. २५ व २८ नोव्हेंबर रोजी काही पदांची परीक्षा सुरळीत झाली. आज परिचर पदाची परीक्षा होते. या पदासाठी ४0 जागांसाठी १६ हजार ९९0 अर्ज आले होते. आज परीक्षा सुरू असताना पुणे येथील आगरकर मुलींच्या शाळेत जिल्हा परिषदेच्या एका कर्मचाऱ्याने सेंटरवर जाऊन पेपर स्कॅन केल्याचा प्रकार केला. हा प्रकार किरकोळ असला तरी उमेदवारांमध्ये परीक्षा प्रक्रियाविषयी संशय निर्माण होऊ नये म्हणून परीक्षा परत घेण्याचा निर्णय घेतल्याचे उमप यांनी सांगितले. सदर कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी, विविध पदांसाठी रविवारी घेण्यात आलेल्या परीक्षासाठी परीक्षार्थींना देण्यात आलेल्या प्रवेश पत्रावरील परीक्षा केंद्र एका रात्रीत बदलण्यात आले. त्यामुळे राज्यातील विविध ठिकाणाहून पुण्यात परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवारांचे हाल झाले. परीक्षा केंद्र प्रमुखांकडूनही या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना चुकीची वागणूक देण्यात आली. त्यामुळे उमेदवारांनी संताप व्यक्त केला. तसेच ही परीक्षा पुन्हा घ्यावी अशी मागणी केली.
जिल्हा परिषदेच्या परिचर पदासह इतर विविध पदांच्या जागांसाठी रविवारी परीक्षा घेतली जाणार होती. पुणे शहरासह जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. उमेदवारांना काही दिवसांपूर्वी आॅनलाईन पद्धतीने प्रवेशपत्र देण्यात आले होते. एमकेसीएलच्या संकेतस्थळावरून काही उमेदवारांनी दोन दिवसांपूर्वी तर काहींनी शनिवारी सायंकाळी ५ वाजता प्रवेशपत्र काढून घेतले होते. त्या वेळी प्रवेशपत्रावरील परीक्षा केंद्रात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. मात्र, शनिवारी रात्री अचानक उमेदवारांचे परीक्षा केंद्र बदलण्यात आले. बदलण्यात आलेल्या परीक्षा केंद्राबाबत उमेदवारांना कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे सर्व उमेदवार प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या परीक्षा केंद्रावर जाऊन पोहचले. मात्र, संबंधित केंद्रावर बैठक क्रमांक नसल्याने उमेदवारांना परीक्षेस बसू दिले नाही. परीक्षा केंद्र बदलाची माहिती रात्री एसएमएसद्वारे सर्वांना कळविण्यात आली असल्याचे परीक्षा केंद्रावरील अधिकारी सांंंगत होते.
जुन्नर येथून परीक्षा देण्यासाठी आलेल्या विष्णू भालचिम याने सांगितले, परिचर पदासाठीच्या परीक्षेसाठी मी दोन दिवसांपूर्वी एमकेसीएलच्या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र काढून घेतले होते. त्या वेळी माझे परीक्षा केंद्र उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयात होते. मात्र, रात्रीतून माझे परीक्षा केंद्र बदलून डेक्कन येथील विमलाबाई गरवारे विद्यालय करण्यात आले. परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांनी केंद्र बदलाची माहिती दिल्यावर मी सुधारित प्रवेशपत्र काढून नवीन केंद्रावर पोहचलो. मात्र, मला परीक्षेस बसू दिले नाही. माझ्यासारख्या अनेक उमेदवारांना परीक्षा देता आली नाही. त्यामुळे काही कारणास्तव परीक्षा न देऊू शकलेल्या उमेदवारांची पुन्हा परीक्षा घ्यावी.
औदुंबर कांबळे म्हणाला, माझे परीक्षा केंद्र शनिवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत उरळी कांचन येथील होते. रात्रीतून ते बदलून शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज करण्यात आले. माझे अनेक मित्र लातूरहून प्रवास करून ही परीक्षा देण्यासाठी आले होते.परीक्षा न देता आल्याने परीक्षा केंद्रावर उमेदवार रडताना दिसून आले. परीक्षा केंद्र प्रमुखांकडून उमेदवारांना वाईट वागणूक देण्यात आली.

Web Title: Take the new test for the sepidestep post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.