राष्ट्रीय भूमिकेतून घुमान संमेलनाकडे पाहू
By Admin | Updated: March 3, 2015 01:23 IST2015-03-03T01:23:28+5:302015-03-03T01:23:28+5:30
महाराष्ट्रातील दोन-चार साहित्यिक सोडले, तर इतरांच्या लेखनाविषयी महाराष्ट्राबाहेर कुणाला माहिती नाही.

राष्ट्रीय भूमिकेतून घुमान संमेलनाकडे पाहू
पुणे : महाराष्ट्रातील दोन-चार साहित्यिक सोडले, तर इतरांच्या लेखनाविषयी महाराष्ट्राबाहेर कुणाला माहिती नाही. देशातील मराठी साहित्यिकांची नव्याने ओळख व्हावी, यासाठी महामंडळाने मराठी वाङ्मयीन नकाशा तयार करावा. राष्ट्रीय भूमिकेतून या संमेलनाकडे पाहू, असा सूर संमेलनाच्या आजी-माजी साहित्यिकांनी लावला.
निमित्त होते घुमान येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे. त्यानिमित्त संयोजन समितीच्या वतीने आजी माजी अध्यक्षांच्या उपस्थितीत सोमवारी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या परिसंवादास डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. राजेंद्र बनहट्टी, डॉ. द. भि. कुलकर्णी आणि नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे सहभागी झाले होते. कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘संतसाहित्याच्या अभ्यासकांना घुमानला जाण्याचा योग येत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांचे वंशज या संमेलनाचे अध्यक्ष आहेत.’’
डॉ. बनहट्टी म्हणाले, ‘‘संत नामदेवांच्या वास्तव्याने पावन झालेल्या घुमान येथे संमेलन होत आहे ही अपूर्व गोष्ट आहे. या संमेलनाच्या माध्यमातून मराठी साहित्यातील समृद्ध परंपरा इतर भाषकांना होईल.’’
देशातील मराठी लेखकांच्या साहित्यिची नव्याने ओळख व्हावी, स्मृती जागविल्या जाव्यात यासाठी मराठी वाङ्मयीन नकाशा तयार केला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करून द. भि. कुलकर्णी म्हणाले, ‘‘साहित्य, सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या घुमान हे फार महत्त्वाचे आहे. मराठीच्या भाषेबाबत चिंता व्यक्त केली जाते. पण, संत नामदेवांनी पंजाबी, हिंदी आणि मराठी अशा वेगवेगळ्या भाषांचे मिश्रण करून मते व्यक्त केली आहेत.’’ (प्रतिनिधी)
सांस्कृतिक, वाङ्मयीन क्षेत्रात संत नामदेवांचे कार्य मोठे आहे. नामदेवांनी पंजाबला शस्त्राने नव्हे, तर प्रेमाने जिंकले आहे. पंजाबी लोकांनीही त्यांना आपले मानले आहे. जेथे-जेथे मराठी लोकांचे साम्राज्य होते, तेथे-तेथे साहित्य संमेलने झाली आहेत. महाराष्ट्राकडे संकुचित प्रदेशवाद नाही. राष्ट्रीय भूमिकेतून या संमेलनाकडे पाहिले पाहिजे. संमेलनानिमित्त संत नामदेवांच्या स्मृतींचा जागर करू, त्यांच्या प्रेरणेजे जल घेऊन येऊ.
- डॉ. सदानंद मोरे, नियोजित अध्यक्ष, घुमान साहित्य संमेलन