दुष्काळग्रस्तांचे प्रश्न कायमचे सोडवण्यास उपाय योजणार

By Admin | Updated: October 12, 2015 01:14 IST2015-10-12T01:14:56+5:302015-10-12T01:14:56+5:30

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला आर्थिक स्वरूपात मदत केली ती तात्पुरती मलमपट्टी होती.

To take immediate steps to resolve the problems of drought victims | दुष्काळग्रस्तांचे प्रश्न कायमचे सोडवण्यास उपाय योजणार

दुष्काळग्रस्तांचे प्रश्न कायमचे सोडवण्यास उपाय योजणार

पुणे : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नीला आर्थिक स्वरूपात मदत केली ती तात्पुरती मलमपट्टी होती. येथून पुढे आम्ही आर्थिक मदत देणार नाही, तर या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय योजत मराठवाड्यातील ग्रामीण भागातील जनतेला रोजगार देणे तसेच जलस्रोताचे पुनरुज्जीवन करणे ही कामे हाती घेणार आहोत, अशी माहिती नाम फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते नाना पाटेकर यांनी रविवारी दिली.
नागरिकांशी संवाद साधणे तसेच मदतनिधीची उभारणी करण्यासाठी नाना पाटेकर शहरात आले होते. पुण्यातील नाम फाउंडेशनच्या कार्यालयावर सकाळपासून अनेक पुणेकरांनी नानांची भेट घेतली व दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हात पुढे केले.
काही महिला संघटनांनी गणपतीच्या काळात गणेशभक्तांकडून आर्थिक मदत गोळा केली होती. वरिष्ठ नागरिकांच्या गटांनी जमवलेली रक्कम शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणली होती. तर अनेकांनी वैयक्तिक पातळीवर आपापल्या परीने जी काही मदत देता येईल ती करण्याचा प्रयत्न केला. काही विद्यार्थ्यांनी स्वत:च्या वाढदिवसावर खर्च न करता तो पैसा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नानांकडे सुपूर्द केला.
या वेळी नाना म्हणाले, समोरच्या व्यक्तीला दुर्बल बनवायचं नाही. दान माणसाला नादान बनविते. मात्र, पुढील काळात आर्थिक मदतीऐवजी कायमस्वरूपी काम करण्यावर भर देण्यात येईल. पावसाळा संपल्यानंतर गरजू लोकांना कपडे शिवणे, सूत कातणे यासारखी इतर स्वयंरोजगाराची कामे उपलब्ध करून देणार आहोत. याबरोबरच गावांमधील आटलेले जलस्रोतांचे स्थानिकांच्या मदतीने श्रमदानातून पुनरुज्जीवन करणार आहोत.
ग्रामीण भागातील लोक जात-धर्म, पक्षीय वितुष्ट या गोष्टीमध्ये अडकले आहेत. दुसरीकडे लोकांचे पोट भरणाऱ्या शेतकरी बांधवांमध्ये आपल्याबद्दल कुणाला काही वाटत नाही, असा समज झाला आहे. त्यांची ही निराशावादी वृत्ती बदलली पाहिजे. ज्यांना आपल्या गावात पाणी प्रश्नावर काम करायचं आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. नोकरीनिमित्त शहरात स्थलांतरित झालेल्या तरुणांना गावात परत आणावे लागेल, असे नानांनी नमूद केले.

Web Title: To take immediate steps to resolve the problems of drought victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.