थंड घ्या; पण पाणी मागू नका !
By Admin | Updated: October 27, 2015 01:14 IST2015-10-27T01:14:33+5:302015-10-27T01:14:33+5:30
रोजच्या कामासाठी नियमितपणे येणारे सुमारे २ हजार कर्मचारी आणि अधिकारी, तर या ना त्या कामानिमित्त या कार्यालयात दररोज येणारे तेवढेच कर्मचारी

थंड घ्या; पण पाणी मागू नका !
पुणे : रोजच्या कामासाठी नियमितपणे येणारे सुमारे २ हजार कर्मचारी आणि अधिकारी, तर या ना त्या कामानिमित्त या कार्यालयात दररोज येणारे तेवढेच कर्मचारी; मात्र त्यांना प्यायला पाणीच नाही. तर एखादी व्यक्ती आली आणि तिने पाणी मागितले तर समोरचा नम्रपणे सांगतो, ‘साहेब थंड देतो, पण पाणी नका मागू.’ ही सत्यस्थिती आहे तब्बल १६०० कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या पीएमपीच्या स्वारगेट येथील मुख्य कार्यालयाची. महापालिकेकडून शहरात दिवसाआड पाणी देण्यात येत असल्याने तसेच या कार्यालयात पिण्याचे पाणी साठविण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याचे या ठिकाणचे कर्मचारी पाणी बंद असलेल्या दिवशी पाण्याच्या बाटल्या भरून आणण्यासाठी परिसरात वणवण फिरताना दिसतात.
महापालिकेकडून पीएमपीसाठी दररोज पिण्याचे पाणी पुरविले जाते. मात्र, हे पाणी साठवून ठेवण्यासाठी पीएमपीकडे स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे महापालिकेकडून पुरविण्यात आलेले पाणी या कर्मचाऱ्यांना एकच दिवस मिळते. तर दुसऱ्या दिवशी या कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी परिसरात हॉटेल तसेच इतर शासकीय कार्यालयांचा आधार घ्यावा लागतो. विशेष म्हणजे शासकीय सुटीच्या दुसऱ्या दिवशी पाण्यासाठी या कर्मचाऱ्यांना सर्वाधिक वणवण करावी लागते. हीच स्थिती अधिकारी कार्यालयाचीही आहे. काही ठरावीक अधिकारी वगळता इतर अधिकाऱ्यांनाही पिण्यासाठी पाणी नाही. त्यामुळे हे अधिकारीही कार्यालयात पाण्याच्या बाटल्या भरून ठेवतात. मात्र, हे पाणी संपल्यानंतर येणाऱ्या प्रत्येकाला, एक वेळ थंड मागा देतो; मात्र पाणी मागू नका, असा आग्रह अभ्यंगतांना करण्याची वेळ येत असल्याचे हे अधिकारी सांगतात.