वाफगाव किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातून काढून घ्या; गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 10:53 AM2023-12-27T10:53:59+5:302023-12-27T10:56:43+5:30

येत्या ६ जानेवारीला महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनी निर्णय घ्यावा अशी मागणी पडळकरांनी पत्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली. 

Take away the possession of Wafgaon Fort from Rayat Education Institution; Gopichand Padalkar letter to CM Eknath Shinde | वाफगाव किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातून काढून घ्या; गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

वाफगाव किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातून काढून घ्या; गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे - बहुजनांच्या पराक्रमी इतिहासाची प्रस्थापितांच्या गेल्या सत्तर वर्षाच्या सत्तेत कायम हेळसांड झाली. आता मात्र वाफगावचा किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातून काढून महाराष्ट्र पुरातत्व विभागाच्या ताब्यात द्यावा व  तिथे होळकरशाहीच्या इतिहासाचे संवर्धन व जतन करावे यासाठी सरकारकडे वारंवार मागणी केली आहे अशा आशयाचे पत्र भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं आहे. 

आमदार गोपीचंद पडळकरांनी पत्रात म्हटलंय की, देशात पहिल्यांदा भटके विमुक्त आदिवासी बहुजनांची फौज बांधून इंग्रजांना २२ वेळेस युद्धात हरवणारे राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ पुणे जिल्ह्यातील किल्ले वाफगाव आहे. महाराष्ट्रात श्रीमंत मल्हाराव होळकरांनी बांधलेला एकमेव भुईकोट किल्ला शिल्लक आहे. ही पवित्र वास्तू देशातील धनगर व समस्त बहुजन आठरापगड बांधवांचे श्रद्धास्थान आहे. सध्या महायुती सरकारच्या काळात काही सकारात्मक बाबी होत आहेत पण सध्या ही वास्तू रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे. असे असताना किल्ले वाफगावच्या विकासासाठी स्थानिक जिल्हा प्रशासानाकडून १० कोटीचा निधी देणे म्हणजे रयत शिक्षण संस्थेच्या पथ्यावरच हा निधी पडेल याची भीती धनगर बांधवांना आहे असं पडळकरांनी म्हटलं आहे. 

त्याचसोबत कदाचित सरकारचा हेतू शुद्ध असला तरी मुळ मागणीला खोडा घालणारा आहे हे सरकारने लक्षात घ्यावे. त्यामुळे ज्याप्रमाणे किल्ले रायगडाचा स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करून शेकडो कोटी रूपयांच्या निधींची तरतूद केली आहे, त्याच धर्तीवर आपण किल्ले वाफगावचा विकास करावा. किल्ले वाफगाव विकास प्राधिकरण स्थापन करावे, समग्र विकास आराखडा साजर करावा. महाराजा यशवंतराव होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसा शेकडो कोटींचा निधी देण्यात यावा याची घोषणा करावी. येत्या ६ जानेवारीला महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनी निर्णय घ्यावा अशी मागणी पडळकरांनी पत्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली. 

दरम्यान, सरकारला शक्य नसल्यास आम्हा धनगर बहुजन बांधवास परवानगी द्यावी की आम्ही स्वतः आमच्या राजराजेश्वर यशवंतराव होळकरांच्या  किल्ले वाफगावचा  भव्यदिव्य स्वरूपात लोकवर्गणीतून जीर्णोद्धार करू असंही पत्रातून पडळकरांनी सांगितले आहे. 

Web Title: Take away the possession of Wafgaon Fort from Rayat Education Institution; Gopichand Padalkar letter to CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.