धनगर आरक्षणाची कार्यवाही करा
By Admin | Updated: March 29, 2017 00:00 IST2017-03-29T00:00:33+5:302017-03-29T00:00:33+5:30
दौंड तालुक्यासह राज्यातील सर्वच भूमिहीनांची शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करावीत व धनगर समाजाला

धनगर आरक्षणाची कार्यवाही करा
यवत : दौंड तालुक्यासह राज्यातील सर्वच भूमिहीनांची शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करावीत व धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची सत्वर कार्यवाही करा, अशी मागणी आमदार अॅड. राहुल कुल यांनी सभागृहात केली. अर्थसंकल्पीय चर्चेच्या दुसऱ्या दिवशी ते सभागृहात बोलत होते.
महसूल, वन, आदिवासी विकास, सार्वजनिक बांधकाम आदी विषयांच्या मागण्यावर सभागृहात चर्चा सुरू होती. महसूल विभागावर चर्चा करताना आमदार कुल म्हणाले, की राज्यातील भूमिहीनांनी राहण्यासाठी अनेक ठिकाणी अतिक्रमणे केलेली आहेत सद्य:स्थितीला ही अतिक्रमणे शासन काढू शकते, अशी परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे ती राहण्यासाठी करण्यात आलेली अतिक्रमणे नियमित करण्याचे धोरण शासनाने राबविण्याची आवश्यकता आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक कुटुंबाला घर देण्याची घोषणा केलेली आहे, तर या भूमिहीनांची घरे काढली तर यांना पुन्हा घर द्यावे लागेल, त्याऐवजी ती अतिक्रमणे नियमित केली तर शासनास याचा फायदा म्हणून महसूल मिळेल. धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिलेले आहे. अभ्यास गटाची स्थापना झालेली आहे त्यांचा अहवाल त्वरित मागवून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची कार्यवाही व्हावी अशी मागणी त्यांनी केली. (वार्ताहर)
बिबटे बांधावर आले... संरक्षण द्या
आमच्या ग्रामीण भागात पूर्वी वाघ किंवा बिबटे हे अभयारण्य किंवा प्राणीसंग्रहालयातच पाहायला मिळायचे; परंतु आता बिबटे आमच्या शेताच्या बांधावर येऊन पोहोचले आहेत. शेतकऱ्यांची कित्येक पाळीव जनावरे बिबट्यांनी खाऊन फस्त केलेली आहेत. त्यापासून शेतकऱ्यांना संरक्षण तसेच नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली.