शिरूर : येथील तहसील कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांचे कामे करून देतो असे सांगत पैसे उकळणाऱ्या एजंटांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी तहसीलदार लैला शेख यांना दिल्या.
तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेची बैठक पार पडली. त्यावेळी आमदार पवार बोलत होते. यावेळी तहसीलदार लैला शेख, नायब तहसीलदार गिरिगोसावी, शिरूर तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष ॲड. सुदीप गुंदेचा, शिरूर तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अशासकीय सदस्य रामभाऊ शेटे, रंजन झांबरे, ॲड. रवींद्र खांडरे, सदस्या चेतना ढमढेरे, गोरक्ष तांबे उपस्थित होते. दरम्यान, आमदार पवार यांच्या हस्ते लाभार्थी पात्र महिलांना योजनेचे वाटप करण्यात आले .
आमदार पवार म्हणाले, योजनेचा लाभ घेताना लाभार्थ्यांनी कागदपत्रांच्या खर्चाबाबत नेमलेल्या सदस्यांकडूनच पूर्ण माहिती घ्यावी. कोणालाही शासकीय फी वगळता जादा पैसे देऊ नये. तसेच तसेच नागरिकांची लूट होऊ नये यासाठी तहसील कार्यालयातील सेतू केंद्राबाहेर व महा ई-सेवा केंद्राबाहेर लागणाऱ्या कागदपत्राबाबत खर्चाचे तपशील असणारे फलक लावून जास्त पैसे घेणाऱ्या एजंटांबाबत तक्रार करण्यासाठी अधिकाऱ्यांचे फोन नंबर टाकण्याच्या व चुकीच्या पद्धतीने पैसे घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.