तहसीलदार मागतात रेशनिंगच्या प्रत्येक कट्ट्याला १0 रुपये

By Admin | Updated: January 28, 2015 23:42 IST2015-01-28T23:42:55+5:302015-01-28T23:42:55+5:30

रेशनिंगच्या धान्याच्या प्रत्येक कट्ट्याला १० रुपये याप्रमाणे दरमहा ४० हजारांची मागणी वेल्ह्याचे तहसीलदार रामलिंग चव्हाण आमच्याकडे करीत असल्याचा

The Tahsildar asks for Rs.10 per cartrion | तहसीलदार मागतात रेशनिंगच्या प्रत्येक कट्ट्याला १0 रुपये

तहसीलदार मागतात रेशनिंगच्या प्रत्येक कट्ट्याला १0 रुपये

मार्गासनी : रेशनिंगच्या धान्याच्या प्रत्येक कट्ट्याला १० रुपये याप्रमाणे दरमहा ४० हजारांची मागणी वेल्ह्याचे तहसीलदार रामलिंग चव्हाण आमच्याकडे करीत असल्याचा गंभीर आरोप करून कर्मचा-यांनी त्यांच्या काळ्या कारभाराचा भंडाफोड केला.
गेल्या काही दिवसांपासून वेल्हेचे तहसीलदार व कार्यालयातील कर्मचारी यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. यापार्श्वभूमीवर मंगळवारी तहसील कार्यालयात जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत तहसीलदारांची बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांवर गंभीर आरोप केले.
तहसीलदार कचेरीतील कर्मचाऱ्यांशी असभ्य भाषेत बोलून मानसिक, शारीरिक व आर्थिक पिळवणूक करीत असल्याची तक्रार सुमारे ३० कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे करून त्यांच्या बदलीची मागणी केली होती. यानंतर तहसीलदारांनी महसूल संघटनेचे तालुकाध्यक्ष व येथील अव्वल कारकून प्रकाश धानेपकर यांनी कर्मचाऱ्यांच्या सह्या दबावाखाली घेतल्या असून, ते कामकाजात अडथळा आणत असल्याचा आरोप केला होते. यापार्श्वभूमीवर जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक चव्हाण, सरचिटणीस विनायक राऊत, विभागीय कोषाध्यक्ष अंकुश अटोळे यांनी या कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. यात कर्मचाऱ्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला.
बैठकीच्या सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी तक्रारीच्या निवेदनावर आम्ही कोणाच्याही दबावाखाली सह्या केल्या नसून, तहसीलदार तक्रारीकडे दुर्लक्ष करून दिशाभूल करीत आहेत, अशी भूमिका मांडली. मंडलाधिकारी एम. पी. नेरेकर यांनी सांगितले, की तहसीलदारांनी पगार सात-सात महिने थांबवला. कर्मचाऱ्यांच्या आजारी वडिलांनी विनंती करूनदेखील पगार काढला नाही. नंतर प्रांताधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यावर पगार देण्यात आला. एन.जी. भाट यांनी तहसीलदार अर्वाच्च भाषा वापरत असल्याचे सांगितले, तर सागर तिडके यांनी ते मानसिक त्रास देतात, असे सांगितले.
गोडाऊनकिपर एस. एस. रोकडे यांनी, तर तहसीलदारांनी रेशनिंगच्या धान्याच्या प्रत्येक कट्ट्याला १० रुपयांची मागणी माझ्याकडे केली. तालुक्यात दरमहा सरासरी चार हजार कट्टा येत असून, दहा रुपयांप्रमाणे दरमहा ४० हजारांची मागणी ते माझ्याकडे करीत आहेत. शिवाय महिन्याप्रमाणे मागील सहा महिन्यांचे मिळून दोन लाख चाळीस हजार रुपये आणा, आसा आदेशच त्यांनी दिला आहे. दिवाळीमध्ये आलेल्या साखरेमधील सात पोती साखर त्यांनी बाजूला काढून ठेवावयास सांगितल्याचेही रोकडे यांनी सांगितले.
तसेच, चव्हाण यांनी अक्कलकोट येते कार्यरत असतानाचे २०१२ चे अपूर्ण काम येथील कर्मचाऱ्यांकडून २०१४ मध्ये करून घेतल्याचेही कर्मचाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: The Tahsildar asks for Rs.10 per cartrion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.