तन, मन, धन केले अर्पण पांडुरंगचरणी!
By Admin | Updated: July 27, 2015 04:03 IST2015-07-27T04:03:36+5:302015-07-27T04:03:36+5:30
स्वत:च्या मालकीची कोट्यवधी रुपयांची जमीन पंढरपूर येथील मठाच्या कामासाठी दान करून कलावती शेलार यांनी आपला प्रत्येक श्वास एकप्रकारे पांडुरंगचरणी अर्पण केला आहे.

तन, मन, धन केले अर्पण पांडुरंगचरणी!
प्रकाश शेलार,केडगाव
स्वत:च्या मालकीची कोट्यवधी रुपयांची जमीन पंढरपूर येथील मठाच्या कामासाठी दान करून कलावती शेलार यांनी आपला प्रत्येक श्वास एकप्रकारे पांडुरंगचरणी अर्पण केला आहे.
गेल्या १५ वर्षांपासून कलावती गणपत शेलार या संगम (ता. दौंड, जि. पुणे) येथे येणाऱ्या भाविक-पाहुण्यांचे स्वागत हे चहापान व अन्नदान देऊन करतात. त्यांना परिसरात मामी म्हणून ओळखतात. पांडुरंगसेवा व जनसेवा हीच ईश्वरसेवा हे त्यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. शेलार या मूळच्या रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथील रहिवासी आहेत. सन १९६४मध्ये त्यांनी संतराज महाराज पालखीसमवेत आषाढी पायी वारीला सुरुवात केली. संस्थानचा मानाचा हंडा सोबत घेऊन सलग ४० वर्षे पायी पंढरीची वारी केली.
सन १९८५मध्ये पतीचे निधन झाले. पतीच्या इच्छेप्रमाणे ४ कोटी किमतीची ८ एकर जमीन कलावती यांनी १९९७ मध्ये संतराज देवस्थानला भेट दिली. संतराज देवस्थानने सर्वानुमते व धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या परवानगीने भेट मिळालेली ही शेतजमीन विकली. मिळालेल्या पैशातून पंढरपूर येथे ९ हजार ५०० चौरस फूट आकाराच्या मठाचे व मंगल कार्यालयाचे बांधकाम केले.
विशेष म्हणजे शेलार परिवाराने या वास्तूला कुठेही स्वत:चे नाव दिले नाही. पतीच्या निधनानंतर एकट्या पडलेल्या कलावतीमामींनी संगम येथे राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून त्या संगमच्या पांडुरंगचरणी सेवा करत आहेत. दररोज या परिसरात काकडा आरती, वीणावादन, पोथीवाचन असा त्यांचा नित्यक्रम आहे.
शेजारीच एका छोट्या खोलीमध्ये त्या राहतात. दिवसभर संगम येथे येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांची आस्थेने विचारपूस करून भुकेलेल्यांना अन्न व चहापाणी देतात. दिवसभर भटारखाना सुरू असतो.
या कामासाठी नंदा बंड ही महिला त्यांना मदत करते. सध्या मामी ८३ वर्षांच्या झाल्या आहेत. गेल्या ८ वर्षांपासून पाय थकल्यामुळे त्या वारीला जात नाहीत; परंतु संगम येथील पांडुरंगाची व भाविकांची सेवा अखंड सुरू आहे.