घुमानची विमानवारी अधांतरीच

By Admin | Updated: January 19, 2015 23:29 IST2015-01-19T23:29:48+5:302015-01-19T23:29:48+5:30

घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मोठा गाजावाजा करून आखण्यात आलेली ‘विमानवारी’ची आशा धूसर होण्याचे संकेत मिळाले आहेत.

Swirling Flight MHz | घुमानची विमानवारी अधांतरीच

घुमानची विमानवारी अधांतरीच

नम्रता फडणीस : पुणे
घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मोठा गाजावाजा करून आखण्यात आलेली ‘विमानवारी’ची आशा धूसर होण्याचे संकेत मिळाले आहेत. ज्या एअर कंपनीशी संमेलनाच्या आयोजकांची बोलणी सुरू होती, त्याच्यांशी सवलतीच्या दरात विमानसेवा उपलब्ध करून देण्याचे ‘आकडे’च जुळत नसल्याने ही सेवा रद्द करण्याचा विचार आयोजक करीत आहेत. त्यामुळे पुण्याहून अमृतसरला भरारी घेणारे हे विमान ‘टेकआॅफ’ होण्यापूर्वीच जवळपास ‘लँडिंग’ झाल्याचे एका अर्थाने स्पष्ट झाले आहे.
यंदा साहित्य संमेलन घुमानसारख्या लांब पल्ल्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्यामुळे रसिकांना संमेलनाकडे आकर्षित करण्यासाठी संमेलनाच्या इतिहासात प्रथमच आयोजकांकडून विशेष रेल्वे व पुणे ते अमृतसर विमानसेवा उपलब्ध करून देण्याचा घाट घालण्यात आला. यात रेल्वेसेवेला हिरवा कंदील मिळाला असला, तरी विमानसेवा सवलतीच्या दरात देण्याचे आयोजकांचे प्रयत्न मात्र निष्फळ ठरले आहेत. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या मध्यस्थीने ‘गो एअर’ या विमान कंपनीकडे सवलतीच्या दरात विमानसेवा रसिकांना देण्यात यावी, यासंबंधीचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र, या विमान कंपनीने जाण्या-येण्याकरिता ३५ हजार रुपये दर सांगितला असून, तो सर्वसामान्यांना परवडणारा नाही.
कोणत्याही परिस्थितीमध्ये हे शुल्क कमी करण्यास कंपनी तयार नाही. त्यामुळे अपरिहार्यतेमुळे ही विमानसेवा रद्द करावी लागणार असल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तरीही, ३ महिने आधी ६० ते ७० रसिकांनी पुणे-दिल्ली-अमृतसर विमानसेवेचे वैयक्तिक बुकिंग केले असल्याचेही ते म्हणाले.

४अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने यंदा महाराष्ट्रातून आलेल्या निमंत्रणांना बगल देत संमेलन खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक करण्यासाठी पंजाबमधील ‘घुमान’ या संत नामदेवांच्या कर्मभूमीत हे साहित्य संमेलन घेण्याचे निश्चित केले.
४या महामंडळाच्या निर्णयावर साहित्य वर्तुळातून टीकेची झोडही उठली. त्या भागात मराठी भाषकांची संख्या कमी असल्यामुळे ग्रंथविक्री होणार नसल्याचे सांगून प्रकाशकांनी नाराजीही व्यक्त केली. त्यामुळे संमेलनाला नक्की किती मराठी भाषक जाणार, हे अजून कोडेच आहे. तरीही संमेलनाला ७ ते ८ हजार रसिक येतील, असा दावा आयोजक करीत आहेत.
४रेल्वेने अमृतसरला जाण्यासाठी तब्बल दोन दिवस लागत असल्यामुळे अनेक जण सवलतीच्या दरातील विमानसेवेचा लाभ घेण्याचे नियोजन करीत होते; मात्र विमानसेवाच रद्द झाल्यामुळे त्याचा काहीअंशी संमेलनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Web Title: Swirling Flight MHz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.