स्वाइन फ्लूचा वाढला धोका
By Admin | Updated: April 14, 2017 04:24 IST2017-04-14T04:24:24+5:302017-04-14T04:24:24+5:30
ऐन उन्हाळ्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या तापमानामध्ये सातत्याने चढ-उतार

स्वाइन फ्लूचा वाढला धोका
पिंपरी : ऐन उन्हाळ्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पाहायला मिळत आहे. सध्या तापमानामध्ये सातत्याने चढ-उतार होत असल्याने हे वातावरण स्वाइन फ्लूला अनुकूल ठरू शकते, असे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात स्वाइन फ्लू वाढत आहे. केवळ हिवाळा आणि पावसाळ्यातच होतो, हा दावा यंदा फोल ठरला असून, ऐन उन्हाळ्यात या आजाराचे शेकडो रुग्ण आढळल्याने वैद्यकीय तज्ज्ञदेखील बुचकाळ्यात पडले आहेत. स्वाइन फ्लूच्या या प्रादुर्भावामागे तापमानामध्ये होणारा बदल असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
सध्या शहरातील तापमान ३६ ते ३८ अंशापर्यंत असते. मात्र, अचानक उष्णतेची लाट येऊन चार-पाच दिवसांसाठी पारा ४१ अंशापर्यंत चढतो.
तसेच दिवसभरात सकाळ, दुपार आणि रात्रीच्या तापामानात असणारी मोठी तफावत स्वाइन फ्लूच्या विषाणूसाठी पोषक ठरत असल्याने हे विषाणू उन्हाळ्यातही टिकाव धरून आहेत. त्यामुळेच शहरात तीन महिन्यांमध्ये ११ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात बुधवारी ४१०९ रुग्णांची तपासणी केली असता ४२२ जणांना तापसदृश्य आजाराची लागण झाल्याचे दिसून आले. यापैकी ३७ जणांना टॅमी फ्लू देण्यात आल्या आहेत तर तीन जणांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. सात रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून त्यापैकी एका रुग्णावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.(प्रतिनिधी)
दिवसभराच्या तापमानात मोठी तफावत असल्याने हे वातावरण विषाणूंसाठी पोषक ठरत आहे. मार्चमध्ये दुपारी कडक ऊन आणि रात्री थंडी असे वातावरण होते. या वातावरणामुळे विषाणूंचा जोर वाढला होता. मात्र, सध्या या विषाणूंचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. तरीही लोकांनी तापसदृश्य आजार जाणवू लागल्यास लगेच तपासणी करून घ्यावी.
- डॉ. लक्ष्मण गोफणे,
समन्वयक अधिकारी, स्वाइन फ्लू नियंत्रक कक्ष