दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे तरणतलाव बंद
By Admin | Updated: June 9, 2014 05:16 IST2014-06-09T05:16:08+5:302014-06-09T05:16:08+5:30
खराब दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे प्राधिकरण, निगडी येथील छत्रपती शिवाजीमहाराज, मोहननगर, चिंचवडच्या राजर्षी शाहूमहाराज आणि सांगवी येथील शितोळे सार्वजनिक तलाव आज बंद ठेवण्यात आले

दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे तरणतलाव बंद
पिंपरी : खराब दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे प्राधिकरण, निगडी येथील छत्रपती शिवाजीमहाराज, मोहननगर, चिंचवडच्या राजर्षी शाहूमहाराज आणि सांगवी येथील शितोळे सार्वजनिक तलाव आज बंद ठेवण्यात आले. घाण पाण्यामुळे नागरिकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. यामुळे नियमित पोहणारे व पासधारकांची गैरसोय झाली.
काल शनिवारपासूनच तलावाचे पाणी खराब झाले होते. त्यातून दुर्गंध येत असल्याने नागरिकांना पोहताना पाण्याचा त्रास होऊ लागला. याबाबत तलाव व्यवस्थापकांकडे नागरिकांनी तक्रारी केल्या. तिकीट काढूनही शुद्ध पाणी पुरविले जात नसल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला. ओरड सुरू केली. त्यामुळे काही तलाव काल दुपारनंतर बंद ठेवण्यात आले. आज साप्ताहिक सुटीच्या दिवशी या तिन्ही तलावांना टाळे होते. खराब पाण्यामुळे अनेकांना उलटी, तसेच त्वचेला खाज सुटण्याचा त्रास झाला. विशेषत: लहान मुलांना तो अधिक जाणवला.
प्रवेशद्वावरील तलाव बंदचा फलक पाहून अनेकांना माघारी फिरावे लागले. पासधारकांनी या मनस्तापाचा त्रागा केला. खराब पाण्यामुळे वारंवार तलाव बंद ठेवले जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
क्रीडा विभागाच्या भोंगळ कारभारावर टीका केली. गेल्या रविवारी तर दहापैकी केवळ एकच तलाव सुरू होता. या कारभाराबाबत वारंवार तक्रार करूनही महापालिका प्रशासन कार्यवाही करीत नसल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे.
तलावाचे पाणी शुद्धिकरण यंत्रणेचे काम ठेका पद्धतीने सुरू आहे. ठेकेदाराचे कर्मचारी योग्य
पद्धतीने काम करीत असल्याने पाणी
खराब होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच, वीज खंडित
झाल्याने पाणी शुद्धिकरणास
अडथळा येतो. (प्रतिनिधी)