‘पीएमपी’मध्ये होतेय नोटांची अदलाबदली

By Admin | Updated: November 16, 2016 03:06 IST2016-11-16T03:06:33+5:302016-11-16T03:06:33+5:30

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) विविध आगारांमध्ये पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून दिल्या जात असल्याचा दावा

Swap notes that are in PMP | ‘पीएमपी’मध्ये होतेय नोटांची अदलाबदली

‘पीएमपी’मध्ये होतेय नोटांची अदलाबदली

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) विविध आगारांमध्ये पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून दिल्या जात असल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे. ‘पीएमपी’तील काही वाहकांनीही याला दुजोरा दिला आहे. दरम्यान, पीएमपी प्रशासनाने पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून न देण्याबाबत सर्व आगारप्रमुख व रोखपालांना सक्त सूचना दिल्या आहेत. नोटा बदलून दिल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनानेही दिला आहे.
मागील आठवड्यात मंगळवारी पाचशे व हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर बुधवारपासूनच पीएमपीच्या आगारांमध्ये अधिकाऱ्यांकडून परस्पर पाचशे व हजाराच्या नोटा बदलून घेण्यास सुरुवात झाली. वाहकांकडून संबंधित आगाराच्या रोखपालाकडे दैनंदिन रोख रक्कम मिळालेल्या स्वरूपात जमा केली जाते. ही सर्व रक्कम संबंधित रोखपालांकडून बँकेत जमा केली जाते. जी रक्कम जमा झाली आहे, तशी रक्कम आतापर्यंत बँकेत जमा केली जात होती. मात्र, बुधवारनंतर अचानक बँकेत रोखपालांकडून पाचशे व हजार रुपयांच्या नोटांचा भरणा सुरू झाला. पीएमपीतील अधिकाऱ्यांकडून नोटा बदलून घेण्यात आल्या. तसेच काही बाहेरील लोकांनीही ओळखीच्या आधारे पैसे बदलून घेतल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे. बुधवारी काही जणांनी नोटा बदलून घेण्याचे प्रकार घडल्याचे पीएमपीच्या एका अधिकाऱ्यानेही स्पष्ट केले.
याबाबत काही वाहकांशी संपर्क साधला असता नोटा बदलण्याच्या प्रकाराला त्यांनीही दुजोरा दिला. मंगळवारी रात्रीपासूनच हा प्रकार सुरू झाल्याचे काही वाहकांनी सांगितले. याबाबत सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी कामगार संघटनांनी केली आहे. तसेच, पीएमपी प्रवासी मंचाचे जुगल राठीही यांनीही हा प्रकार गंभीर असल्याचे सांगितले. नोटा बदलून दिल्या गेल्या असल्यास हा मोठा घोटाळा आहे. त्यामुळे याबाबत चौकशी करण्याची मागणी राठी यांनी केली आहे.

Web Title: Swap notes that are in PMP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.