चिमुकलीने गिळला सेल
By Admin | Updated: January 25, 2017 02:07 IST2017-01-25T02:07:46+5:302017-01-25T02:07:46+5:30
खेळताना हाती लागलेला टीव्ही रिमोटचा सेल दीड वर्षाच्या चिमुकलीने तोंडात घातला. सेल गिळल्याने पोटात गेला.

चिमुकलीने गिळला सेल
पिंपरी : खेळताना हाती लागलेला टीव्ही रिमोटचा सेल दीड वर्षाच्या चिमुकलीने तोंडात घातला. सेल गिळल्याने पोटात गेला. ही घटना सकाळी ११च्या सुमारास चिंचवडगाव येथे घडली. क्रांती पवार असे या चिमुकलीचे नाव आहे. रिमोट सेलमध्ये रासायनिक घटक असल्याने चिमुकलीला त्रास होऊ लागला. तिला तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तिच्यावर त्वरित दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करण्यात आली. अशाच प्रकारची शहरातील ही तिसरी घटना आहे.
आई घरकामात, तर कुटुंबातील अन्य व्यक्ती त्यांच्या कामात व्यस्त असल्याने घरात खेळणाऱ्या चिमुकलीकडे कोणाचे लक्ष गेले नाही. काही कळण्याच्या आत खेळता-खेळता चिमुकलीने रिमोटचा सेल तोंडात घातला. सेल गिळल्यानंतर तिला त्रास होऊ लागला. ती रडू लागल्याने घरातील व्यक्तींचे तिच्याकडे लक्ष गेले. तोंडात काही तरी गेले असावे, असा अंदाज त्यांनी बांधला. त्याच वेळी टीव्ही रिमोट जवळच पडलेला दिसला. रिमोटला ज्या ठिकाणी सेल लावला जातो. ते झाकण उघडे होते. सेल कोठे दिसून आला नाही. त्यामुळे सेल गिळला असावा, असा संशय आल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. ‘एक्स-रे’ काढल्यानंतर तिने सेल गिळल्याचे लक्षात आले. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केली. (प्रतिनिधी)