स्वरचैतन्याची सुरेल दिवाळी पहाट...
By Admin | Updated: October 28, 2016 04:38 IST2016-10-28T04:38:24+5:302016-10-28T04:38:24+5:30
दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण! रांगोळीचा सडा.. अंधाराला कवेत घेत आसमंतात तेजोमयी प्रकाश पसरविणारे आकाशकंदील... फटाक्यांची आतषबाजी...

स्वरचैतन्याची सुरेल दिवाळी पहाट...
पुणे : दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण! रांगोळीचा सडा.. अंधाराला कवेत घेत आसमंतात तेजोमयी प्रकाश पसरविणारे आकाशकंदील... फटाक्यांची आतषबाजी... नवचैतन्याची अनुभूती अशा मंतरलेल्या वातावरणात सुरांची अनोखी मेजवानी मिळाली तर..! शीतल गारवा.. मंद वाऱ्याची झुळूक... याचबरोबर कानाला तृप्त व प्रसन्न करणारी सुरेल पहाट लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (रविवारी, दि़ ३०) रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
अभिजात संगीतक्षेत्रातील दोन दिग्गज स्वरशिरोमणी पं. राजन-साजन मिश्रा आणि सरोदवादनात स्वत:चा वेगळा ठसा उमटविणाऱ्या अमान आणि अयान अली खाँ अशा जुन्या-नव्या प्रतिभावंत कलावंतांच्या सुरेल आविष्काराने रसिकांची पहाट अविस्मरणीय ठरणार आहे. ‘लोकमत’तर्फे आयोजित, बी.एन. अष्टेकर प्रस्तुत आणि कोहिनूर ग्रुपच्या सहयोगाने ‘स्वरचैतन्य : दिवाळी पहाट’ रविवारी, ३० आॅक्टोबर रोजी पहाटे ५.३० वाजता कृष्णसुंदर गार्डन येथे रंगणार आहे. व्यासपीठावर त्यांचे आगमन होताच आसमंतात स्वरसुमनांची पखरण होत चैतन्याचा सुगंध दरवळू लागतो आणि मधुर स्वरांमध्ये तल्लीन झाल्याची प्रचिती येते. बनारस घराण्यामध्ये नृत्याचा प्रभाव अधिक असल्याने त्यांच्या बंदिशी नृत्याच्या अंगाने जाणाऱ्या आहेत, ज्यातून रागातील भावांचे प्रकटीकरण केले जाते. दुर्गा रागातील ‘जय जय दुर्गे’, मेघमल्हारमधील ‘बादल गर्जे घनघोर रे’ या त्यांच्या बंदिशी रसिकांच्या मनाचा ठाव घेतात. आपापसातील प्रेम ही त्यांच्या सूरांची ताकद. एकमेकांच्या आवाजाचा पोत, सुरांमधील चढ-उतार सांभाळत रसिकांना अभिजात सुरांचे ते दर्शन घडवितात. अशा दिग्गज कलाकारांच्या स्वरांची अद्वितीय अनुभूती रसिकांना मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे सहयोगी प्रायोजक मॅन्गो हॉलीडेज, स्वीट पार्टनर काका हलवाई स्विट सेंटर, टी-पार्टनर विक्रम टी, हॉस्पिटॅलिटी पार्टनर जे डब्ल्यू मॅरिएट, लक्झरी पार्टनर आॅडी पुणे, हेल्थ पार्टनर नाइक होमिओपॅथी, शॉपिंग पार्टनर हायपर सिटी, हायजिनीक पार्टनर फॉर्च्युन फूड आॅईल, बँकिंग पार्टनर सेंट्रल बँक आॅफ इंडिया आहेत़ तर, सहप्रायोजक कावरे आइस्क्रीम व लक्ष्मीनारायण चिवडा हे आहेत़ अमित गायकवाड यांचे कृष्णसुंदर गार्डन स्थळाचे प्रायोजक आणि एबीपी माझा माध्यम प्रायोजक आहेत. प्रवेशिकांच्या माहितीसाठी ‘लोकमत’च्या कार्यालयात (०२०) ६६८४८५८६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)
- पं. राजन व साजन मिश्रा ही भारतीय अभिजात संगीतक्षेत्रातील दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वे. बनारस घराण्याच्या गायकीचे संस्कार, श्रोत्यांना काय हवे आहे, याचे भान ठेवून सादरीकरणावर दिला जाणारा भर, शास्त्रशुद्ध आणि भारदस्त गायकीतून रसिकांना खिळवून ठेवण्याची ताकद ही त्यांच्या मैफिलीची वैशिष्ट्ये.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खाँ यांचे चिरंजीव अमान आणि अयान अली खाँ यांच्याही सरोदवादनाची जादू अनुभवता येणार आहे. एकल आणि एकत्रित वादनातून सांगीतिक विश्वात स्वत:चा वेगळा ठसा उमटविला आहे. भारतीय आणि पाश्चात्त्य संगीताच्या मिलाफातून साकार होणाऱ्या ‘फ्यूजन’चे सादरीकरण हे त्यांच्या वादनाचे वेगळेपण आहे.
- कार्यक्रमासाठी कोणतेही प्रवेशमूल्य आकारले जाणार नाही. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. निमंत्रितांसाठी
काही जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. प्रवेश सर्वांसाठी खुला आहे़