‘स्मार्ट सिटी’साठी ‘एसव्हीपी’ कंपनी
By Admin | Updated: January 10, 2017 03:25 IST2017-01-10T03:25:32+5:302017-01-10T03:25:32+5:30
पिंपरी-चिंचवड शहरात ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प राबविण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेइकल (एसपीव्ही) कंपनी स्थापन करणे आवश्यक असून

‘स्मार्ट सिटी’साठी ‘एसव्हीपी’ कंपनी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प राबविण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेइकल (एसपीव्ही) कंपनी स्थापन करणे आवश्यक असून, ही कंपनी स्थापन करण्याचे आदेश राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेला दिले आहेत. कंपनी अधिनियमांतर्गत स्थापन करण्यात आलेली एसपीव्ही ही शासकीय कंपनी असेल.
या कंपनीचे अध्यक्ष नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर हे असतील. तसेच, महापालिकेचे आयुक्त, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेता यांच्यासह सत्ताधारी वगळून इतर दोन राजकीय पक्षांचा प्रत्येकी एक नगरसेवक या कंपनीचे संचालक असणार आहेत. तर, शासनाचे प्रतिनिधी म्हणून तर पुण्याचे विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, पीएमपीचे अध्यक्ष हे कंपनीचे संचालक असतील. तसेच केंद्र शासनाचा एक प्रतिनिधी, केंद्रीय कंपनी व्यवहाराचे दोन स्वतंत्र संचालक असतील. यासह एसव्हीपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. ही कंपनी स्थापन करण्याचे आदेश सरकारने महापालिकेला दिले आहेत. या कंपनीचे नाव ठरविण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. तसेच, कंपनीचे मुख्यालय पिंपरी-चिंचवड महापालिकेतच असणार आहे.(प्रतिनिधी)
४कंपनीला राज्य शासनाचे खरेदीविषयक धोरण लागू राहणार आहे. विविध प्रकल्पांसाठी महापालिकेच्या मान्यतेने कर्ज उभे करण्याची मुभा असून कर्जाची संपूर्ण जबाबदारी कंपनीची आणि महापालिकेची असेल. या कर्जाची सरकार कोणतीही हमी घेणार नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पीपीपी तत्त्वावर राबविण्यात येणारया ५० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या प्रकल्पांना शासनाच्या उच्चाधिकार समितीची पूर्वमान्यता घ्यावी लागणार आहे. एसपीव्ही कंपनीला मुख्य कार्यकारी अधिकारी नेमावा लागणार असून, अधिकारी भारतीय प्रशासकीय सेवेतील असणे आवश्यक आहे.