वृद्धाश्रमातील वृद्धेच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:12 IST2021-05-14T04:12:08+5:302021-05-14T04:12:08+5:30
पुणे : खराडीतील बेहेरे ज्येष्ठ निवास या वृद्धाश्रमात ६ मे २०२० रोजी ७० वर्षीय सुरेखा मोकाशी यांचे निधन झाले. ...

वृद्धाश्रमातील वृद्धेच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी व्हावी
पुणे : खराडीतील बेहेरे ज्येष्ठ निवास या वृद्धाश्रमात ६ मे २०२० रोजी ७० वर्षीय सुरेखा मोकाशी यांचे निधन झाले. मोकाशी यांचा मृत्यू विषबाधेने झाल्याचा संशय तेथेच राहणाऱ्या डॉ. एम. एन. डोंगरे यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी ते गेल्या वर्षभरापासून करत आहेत. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस उपायुक्त, परिमंडळ ४ यांनाही डोंगरे यांनी दिले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, सुरेखा अरविंद मोकाशी यांचे निधन झाल्याचे ६ मे २०२० रोजी सकाळी लक्षात आले. त्या आपल्या खोलीमध्ये एकट्याच राहत होत्या. मेडिकल ऑफिसर म्हणून निवृत्त झालेले डॉ. डोंगरे हेही बेहेरे ज्येष्ठ निवासात राहत होते. येथील वृद्धांना ते वैद्यकीय सल्ला देत आणि वृद्धांचा मृत्यू झाल्यानंतर मृत्यूचा दाखलाही देत असत.
मोकाशी यांच्या मृत्यूनंतर काळी ८ वाजता मेडिकल विभागातील मॅनेजर पाठक यांनी डोंगरे यांना बोलावून तपासण्याची विनंती केली. मोकाशी यांचा चेहरा व मानेचा भाग काळाकुट्ट पडला होता व सर्व शरीर काळेनिळे झालेले होते. त्यांच्या तोंडातून पांढरा फेस आलेला दिसत होता. या सर्व गोष्टीमुळे डोंगरे यांना त्यांचा मृत्यू नैसर्गिक न वाटल्याने त्यांनी सर्टीफिकेट देण्यास नकार दिला. खराडी पोलीस स्टेशनचे इन्चार्ज पीआय यांना फोन करून कळविले. पोलीस स्टेशन इन्चार्ज अधिकाऱ्यांनी आपली माणसे पंचनामा करण्याकरिता पाठविली. मात्र, डोंगरे यांचे स्टेटमेंट घेतले नाही. व्यवस्थापक संदीप माने यांनी श्री हॉस्पिटलच्या इन्चार्ज डॉक्टरांना सर्टिफिकेट देण्याबाबत विनंती केली. त्यांनी स्वतः न येता त्यांच्याकडे काम करणाऱ्या २ डॉक्टरांना दुपारी १२ च्या सुमारास वृध्दाश्रमात पाठविले व त्यांनी मोकाशी यांचा मृत्यूचा दाखला दिल्याचे समजते. हा निर्णय कोणाच्या तरी दबावाखाली घेण्यात आला, असे डॉ. डोंगरे यांचे म्हणणे आहे.
मी पोलिसांना कळवल्यामुळे संदीप गव्हाणे बरेच संतापल्याचे कळते. नंतर त्यांनी दुसऱ्या डॉक्टरांना बोलावून प्रमाणपत्र घेतल्याचे कळते. मी महाराष्ट्र शासनाच्या विभागातून मेडिकल ऑफिसर म्हणून ३० वर्षे नोकरी करून निवृत्त झालो आहे. नोकरीत असताना मी ३००-४०० पोस्टमार्टम केली आहेत. त्यामुळे मोकाशी यांचा मृत्यू नैसर्गिक नसून विषबाधेने झाला आहे, असे मला ठामपणे वाटते, असे डॉ. डोंगरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
-----
संदीप गव्हाणे यांच्या सांगण्यावरूनच श्री हॉस्पिटलच्या इन्चार्ज डॉक्टरांनी आपल्या हाताखाली काम करणाऱ्या ज्युनियर डॉक्टरांना दाखला देण्यास पाठविले. कारण श्री हॉस्पिटलचे इन्चार्ज डॉक्टर व गव्हाणे यांचे संबंध बरेच जवळचे होते. सदर हॉस्पिटलमध्ये वृध्दाश्रमातील सर्व वृध्दांना औषधोपचार घेण्यासाठी पाठविले जात असे व प्रत्येक वेळेस मोठ्या रकमेचे बिल पेशंटला द्यावे लागत असे. तसेच गव्हाणे यांच्यावर एका प्रमुख ट्रस्टींचा आशीर्वाद होता. त्यामुळे ते सभासदांची कोणतीही पर्वा न करता कारभार करीत असत.
- डॉ. म. ना. डोंगरे