Ranjit Kasle: गेल्या काही दिवसांपासून बीडमधील घडामोडींमुळे जिल्ह्यातील तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बीडमध्ये घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांची राज्यभरात चर्चा सुरु आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी खळबळजन आरोप केले होते. वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी केल्याचा दावा रणजीत कासले यांनी केला होता. त्यानंतर ते गायब झाले होते. मात्र आता गुन्हा दाखल झाल्यानंतर रणजीत कासले पुण्यात परतले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला.
खळबळजनक आरोप करणारे बीड सायबर पोलिस ठाण्यातील वादग्रस्त निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले याच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. माजी मंत्री धनंजय मुंडे, संतोष देशमुख खूप प्रकरणातील प्रमुख आरोप वाल्मिक कराडवर रणजित कासलेंनी गंभीर आरोप केले होते. मला वाल्मिक कराडचे एन्काऊंटर करण्यासाठी ऑफर देण्यात आली होती, असा दावाही कासलेंनी केला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर कासले गायब झाले होते. मात्र आता निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पुण्यात दाखल झाले आहेत. आपण पुणे पोलिसांना शरण जाणार असल्याचे कासले यांनी सांगितले. पुणे विमानतळावर माध्यमांशी बोलताना कासले यांनी विधानसभा निवडणुकीत गप्प राहण्यासाठी वाल्मिक कराडने दहा लाख रुपये दिल्याचे सांगितले.
"पुणे पोलिसांना शरण जाण्यासाठी मी आलो आहे. १५ दिवस तरी मला कोणी पकडले नसते. पण माझ्या मित्रांशी बोलून मी निर्णय घेतला. बीडला जाऊन मी शरण जाणार आहे. पुणे पोलिसांना तशी मी विनंती केली आहे की मला संरक्षण देऊन बीड पोलिसांच्या स्वाधीन करावे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी माझ्या खात्यावर १० लाख रुपये जमा करण्यात आले होते. त्यातील साडेसात लाख रुपये मी परत केले आहेत. मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी दिले होते," असा दावा कासले यांनी केला.
"संत बाळूमामा कंस्ट्रक्शन कंपनी ही वाल्मिक कराडच्या मालकीची आहे. या कंपनीत महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत. त्यांच्या कंपनीतून माझ्या बँक खात्यावर दहा लाख रुपये आले होते. यातले साडे सात लाख रुपये मी परत केले आहेत. उर्वरित पैशातून माझा खर्च चालू आहे. ईव्हीएम मशीनपासून दूर जायण्यासाठी तसेच मी गप्प बसावे म्हणून मला हे दहा लाख रुपये देण्यात आले होते. परळीला माझी ड्यूटी होती. धनंजय मुंडे हे चुकीच्या पद्धतीने निवडून आले आहेत," असेही कासले म्हणाले.