शिक्षण मंडळाच्या अधीक्षकांसह ५ कर्मचारी निलंबित
By Admin | Updated: May 3, 2016 03:42 IST2016-05-03T03:42:02+5:302016-05-03T03:42:02+5:30
महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी खरेदी केलेल्या स्वेटरचा दर्जा व किंमत यामध्ये तफावत असणे, योग्य पद्धतीने प्रक्रिया न राबविणे याप्रकरणी शिक्षण मंडळाच्या

शिक्षण मंडळाच्या अधीक्षकांसह ५ कर्मचारी निलंबित
पुणे : महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी खरेदी केलेल्या स्वेटरचा दर्जा व किंमत यामध्ये तफावत असणे, योग्य पद्धतीने प्रक्रिया न राबविणे याप्रकरणी शिक्षण मंडळाच्या अधीक्षकांसह ५ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
शक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी वुलनचे स्वेटर पुरविण्याचा ठेका देण्यात आला होता. त्यासाठी एका स्वेटरसाठी सरासरी ४०० रुपयांचा दर देण्यात आला. मात्र वुलनचे स्वेटर न पुरविता ठेकेदाराने सिंथेटिकचे स्वेटर दिले आहेत, त्याची किंमत बाजारामध्ये खूपच कमी असल्याची तक्रार विनायक फडके यांनी महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच शिक्षण मंडळाचे प्रमुख बबन दहिफळे यांना महापालिकेच्या सेवेतून मुक्त करण्यात आले होते. त्याचबरोबर या खरेदीप्रक्रियेत सहभागी असलेले शिक्षण मंडळाचे अधीक्षक, वरिष्ठ लिपीक अशा ५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. फडके यांनी या स्वेटरची प्रयोगशाळेतून तपासणी करून घेतली. त्याच्या अहवालामध्ये ठेकेदाराने पुरविलेल्या स्वेटर सिंथेटिक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, स्वेटरप्रकरणी तक्रार आल्याने त्याचे बिल चौकशी होऊपर्यंत देऊ नये, अशी मागणी फडके यांनी केली होती, मात्र तरीही शिक्षण मंडळाकडून ठेकेदाराचे बिल आदा करण्यात आले होते. विनायक फडके यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची सखोल कारवाई करण्याचे आदेश कुणाल कुमार यांनी दिले होते. त्यानंतर तत्कालीन शिक्षण मंडळाचे प्रमुख दहिफळे यांना नोटीस बजावण्यात आली होती.
फडके यांनी केलेल्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी नव्याने सुनावणी घेण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले होते. खरेदी प्रक्रियेत सहभागी असणाऱ्यांना आयुक्तांकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्याचे समाधानकारक उत्तर न आल्याने त्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.