पुणे-नाशिक रेल्वेच्या सर्वेक्षणाला सुरुवात
By Admin | Updated: March 23, 2017 04:04 IST2017-03-23T04:04:58+5:302017-03-23T04:04:58+5:30
अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या पुणे-नाशिक रेल्वेचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. हा रेल्वेमार्ग पुणे-नाशिक महामार्गाच्या पूर्व दिशेऐवजी

पुणे-नाशिक रेल्वेच्या सर्वेक्षणाला सुरुवात
राजगुरुनगर : अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेल्या पुणे-नाशिक रेल्वेचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. हा रेल्वेमार्ग पुणे-नाशिक महामार्गाच्या पूर्व दिशेऐवजी पश्चिमेकडून निश्चित झाला आहे. पश्चिमेकडून घेतल्यामुळे प्रस्तावित २६५पैकी ५६ किलोमीटर अंतर वाचणार आहे.
गेल्या वर्षी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजुरी देऊन अर्थसंकल्पात १२१२ कोटींची तरतूद केल्यामुळे हा रेल्वेमार्ग होणार हे निश्चित झाले होते. त्यानुसार २६५ किलोमीटरचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यामध्ये पुणे स्थानक ते राजगुरुनगर व पूर्वेकडे पाबळ, निरगुडसर असा आराखडा तयार केला होता. परंतु महामार्गाच्या पश्चिमेकडून केलेल्या सर्वेक्षणामुळे रेल्वेमार्गाचे अंतर ५६ किलोमीटर कमी होऊन २०९ किलोमीटर होणार आहे. त्यामुळे खर्चात व वेळेतही बचत होणार आहे. पश्चिमेकडून जाणाऱ्या या रेल्वेमार्गात तळेगाव, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर, सिन्नर, नाशिक रोड या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. या मार्गावर एकूण २५ स्थानके असून, त्यामध्ये जुन्या दहा स्थानकांचा समावेश आहे. या महामार्गामुळे पुणे-नगर-नाशिक हे तीन जिल्हे जोडले जाणार असून, चाकण, संगमनेर, सिन्नर व नाशिक या औद्योगिक वसाहतींनाही फायदा होणार आहे. खेडच्या पश्चिमेला सातकरस्थळ हद्दीमधून हा रेल्वेमार्ग जाणार असून, तेथेच रेल्वेस्थानकही होण्याची शक्यता आहे.