ट्रेकिंग दरम्यान केले दिवे घाटाचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:12 IST2021-07-07T04:12:30+5:302021-07-07T04:12:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सासडव : पुरंदर तालुक्यातील ऋणानुबंधच्या माध्यमातून युवक आणि युवतींनी ट्रेक करत दिवे घाट ते कानिफनाथ ...

ट्रेकिंग दरम्यान केले दिवे घाटाचे सर्वेक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
सासडव : पुरंदर तालुक्यातील ऋणानुबंधच्या माध्यमातून युवक आणि युवतींनी ट्रेक करत दिवे घाट ते कानिफनाथ मंदिर बोपगाव या परिसराची वैविध्यपूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून या परिसरातील एेतिहासिक घटनांचे जतन केले जाणार आहे.
पुरंदरच्या इतिहासातील घडलेल्या अनेक घटनांचा, ऐतिहासिक लढायांचा, दिवे घाटातील असलेल्या मस्तानी तलावाचा आणि याच डोंगर रांगांवर वसलेल्या भूलेश्वर, ढवळेश्वर जेजुरीचा खंडोबा, वीरचा म्हस्कोबा या सर्वांचा आध्यात्मिक इतिहास सांगण्याचे काम शिवम टिळेकर यांनी केले. प्रा. निखिल गुरव आणि हृषीकेश जगताप यांनी वनस्पतीच्या प्रजाती आणि पर्यावरण या संदर्भात अभ्यासपूर्ण माहिती दिली. अनेक औषधी वनस्पती, झाडे, वेगळ्या प्रकारची फुलझाडे डोंगर माथ्यावर असणारे अनेक प्रकारचे दगड, गवताच्या प्रजाती यांचा अभ्यास या सर्व्हेतून करण्यात आला.
देशी आणि विदेशी झाडे कशी ओळखायची, त्यांचे फायदे व तोटे या सर्व गोष्टींची माहिती मिळाली.
यामधे रुई, दातपाडी, कडुलिंब, करवंद, बाभूळ, वड, उंदीरमारी, सीताफळ, पानफुटी, वाघाटी, एकदांडी, बोर, टनटनी, काँग्रेस, हिवर, अंबुशी, शमी, उंबर, अंजन, आपटा, माकडशिंगी, दगडफूल, टाकळा, बोगनवेल, निरगील, बिलाईत एरंड, मेडशिंगी, चांदवा, लेकास, करंटा, घंटीफूल, केना, साग, विष्णूकांता, रानजाई, सुबाभूळ, चिंच, शतावरी, जांभूळ, गुळवेल, मोगली एरंड, गुलमोहर, नीलमोहर, कांचन, जास्वंद, दुधानी, आळंबी, सोनचाफा, काटे रिंगणी, पांगारा, चंदन, चिमू काटा, आघाडा, शिसव, पिंपळ, अशोक, करंज या प्रकारची झाडे आढळून आले आहेत.
ऋणानुबंधच्या माध्यमातून दिवे घाटाच्या डोंगररांगेवर ट्रेकच्या दरम्यान १५० बियाणे यावेळी लावण्यात आली. ट्रेक दरम्यान कविता, अभिनय, संगीत, खेळ, गप्पा गोष्टी असे अनेक उपक्रम घेण्यात आले. कवी शिवाजी झुरंगे यांनी आपल्या कवितेतून सर्वांना हसवण्याचा प्रयत्न केला. कानिफनाथ मंदिर परिसरात वड, पिंपळ, चिंच, कडुलिंब या वृक्षांची लागवड करण्यात आली. या ट्रेकचा समारोप ऋणानुबंधच्या सदस्या अंकिता लांडगे यांनी केला.
या मातीत ऋणानुबंध संस्थेमार्फत निसर्ग संवर्धन आणि अनेक सामाजिक कार्यात सक्रिय पुढाकार घेऊन कार्य चालू आहे. यापुढेही सर्व क्षेत्रामध्ये आपणा सर्वांच्या साहाय्याने अविरत कार्य चालू राहील
असे ऋणानुबंध संस्थाचे सदस्य तुषार झुरंगे यांनी सांगितले.
फोटो ः दिवेघाट (ता. पुरंदर) मस्तानी तलाव परिसर येथे पर्यटन, वनस्पतींचा अभ्यास व सर्व्हे करताना युवक-युवतींचा ग्रुप.