टेकड्यांच्या सर्वेक्षणाला वर्षभरापासून मिळेना मुहूर्त !
By Admin | Updated: May 16, 2015 04:21 IST2015-05-16T04:21:04+5:302015-05-16T04:21:04+5:30
आंबेगाव तालुक्यातील माळीणच्या दुर्घटनेनंतर पुणे शहरातील चारही बाजूला असलेल्या टेकड्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला.

टेकड्यांच्या सर्वेक्षणाला वर्षभरापासून मिळेना मुहूर्त !
पुणे : आंबेगाव तालुक्यातील माळीणच्या दुर्घटनेनंतर पुणे शहरातील चारही बाजूला असलेल्या टेकड्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला. मात्र, या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले तरी अद्याप टेकड्यांच्या सर्वेक्षणाला मुहूर्त मिळालेला नाही. गेल्या आठवड्यात आयुक्त कुणाल कुमार यांनी सर्वेक्षणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, धोकादायक टेकडी सर्वेक्षणासाठी विविध संस्थांकडे विचारणा सुरू करण्यात आली आहे.
गोखलेनगर येथील वैदुवाडी येथे वनविभागाची भिंत कोसळली. त्यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी शहरातील टेकड्यांवर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. यापूर्वी येरवडा परिसरातील एका वसाहतीवर दरड कोसळली होती. तेव्हापासून महापालिका हद्दीतील टेकड्यांचे व धोकादायक वसाहतींचे सर्वेक्षण करण्याची चर्चा होती. मात्र, माळीण दुर्घटनेनंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत धोकादायक टेकड्यांचे सर्वेक्षण करण्याचा विषय झाला. त्यानंतर प्रशासनाने सर्वेक्षण करण्याची तयारी दाखविली होती.
शहरात तळजाई, पर्वती, बिबवेवाडी, रामटेकडी, हनुमान टेकडी, वारजे, वेताळ टेकड्या आहेत. पर्वती व बिबवेवाडी टेकडीच्या परिसरात अतिक्रमण करून वसाहती व झोपडपट्टी झाली आहे. त्यामुळे टेकडींच्या परिसरातील संभाव्य धोका लक्षात घेऊन महापालिकेने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, प्रशासनाला मुहूर्त सापडत नव्हता. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात काही आमदारांनी शहरातील टेकड्यांवरील अतिक्रमणाचा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने सर्वेक्षणाचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविला होता.
(प्रतिनिधी)