सुप्रतीकच्या सतार वादनाची मोहिनी

By Admin | Updated: May 19, 2015 01:14 IST2015-05-19T01:14:57+5:302015-05-19T01:14:57+5:30

तिहाईंचा प्रयोग व याला समर्पक अशी तबला साथ हे वैशिष्ट्य होते कोलकत्ता येथील युवा वादक सुप्रतीक सेनगुप्ता यांच्या सतारवादन कार्यक्रमाचे.

SUPRETAK SATAR VAVANEE SINGH | सुप्रतीकच्या सतार वादनाची मोहिनी

सुप्रतीकच्या सतार वादनाची मोहिनी

पुणे : सुरांची आर्तता, मिंडकामातील सौंदर्ययुक्तता, वैशिष्ट्यपूर्ण लयकारी व प्रवाही झालावादन! जलदगतीतील तोडे, तिहाईंचा प्रयोग व याला समर्पक अशी तबला साथ हे वैशिष्ट्य होते कोलकत्ता येथील युवा वादक सुप्रतीक सेनगुप्ता यांच्या सतारवादन कार्यक्रमाचे.
गानवर्धन संस्थेतर्फे रविवारी या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रतीक सेनगुप्ता यांनी मैफलीचा प्रारंभ ‘मारवा’ रागाने केला. आलाप, जोड, झाला व त्यानंतर त्रितालातील गत सादर केली. सायंकालीन मारवा रागाचे स्वरूप उलगडताना भावपूर्ण वातावरण निर्माण केले.
जलद गतीतील तोडे, तिहाईंचा प्रयोग, प्रवाही झाला वादनाने राग खुलवण्याचे त्यांचे वैशिष्ट्य रसिकांना मंत्रमुग्ध करून गेले. त्यांना तबल्यावर पं. नयन घोष यांचे शिष्य व सुपुत्र ईशान घोष या पंधरा वर्षांच्या युवा कलाकाराने समर्पक साथ केली. द्रुत त्रितालमधील ईशानने केलेली संगत रसिकांची विशेष दाद मिळविणारी ठरली.
मैफलीच्या उत्तरार्धात सुप्रतीक यांनी ‘बागेश्री’ रागातील रुपक तालातील गत व ‘किरवाणी’ रागातील दीपचंदी तालातील धून विविध रागमालांच्या सुरावटींनी सजवत नजाकतदार वाजविली.
सुरेश रानडे, जयश्री रानडे, कृ. गो. धर्माधिकारी, रवींद्र दुर्वे, वासंती ब्रह्मे उपस्थित होते. दयानंद घोटकर यांनी सूत्रसंचालन केले.
(प्रतिनिधी)

Web Title: SUPRETAK SATAR VAVANEE SINGH

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.