मराठी नाटकांचा दबदबा

By Admin | Updated: January 25, 2015 00:29 IST2015-01-25T00:29:49+5:302015-01-25T00:29:49+5:30

मराठी नाटकांमध्ये कालपरत्वे संवाद, लेखनशैलीपासून ते अभिनय, सादरीकरणापर्यंत अनेक बदल झाले आहेत, जे निश्चितच सकारात्मक असेच आहेत.

Suppression of Marathi drama | मराठी नाटकांचा दबदबा

मराठी नाटकांचा दबदबा

नम्रता फडणीस - पुणे
मराठी नाटकांमध्ये कालपरत्वे संवाद, लेखनशैलीपासून ते अभिनय, सादरीकरणापर्यंत अनेक बदल झाले आहेत, जे निश्चितच सकारात्मक असेच आहेत. आज रंगभूमीवर सकस लेखन होत नसल्याचे जरी म्हटले जात असले तरी मराठी रंगभूमीवर सातत्याने होत असलेल्या विविधांगी प्रयोगांमुळे प्रादेशिक भाषांमध्ये मराठी नाटकांचा दबदबा कायम असल्याचे ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी सांगितले.
नाटककार, अभिनेता आणि दिग्दर्शक अशा तिहेरी माध्यमातून मराठी रंगभूमीला भरीव योगदान दिलेले सतीश आळेकर येत्या ३0 जानेवारी रोजी वयाची ६५ वर्षे पूर्ण करीत आहेत. तसेच त्यांच्या ‘महानिर्वाण’ या नाटकाला नुकतीच ४0 वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन्हींचे औचित्य साधून आळेकर यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला असता, नाट्यलेखनासह नाटकांमध्ये झालेल्या बदलांचे निरीक्षण त्यांनी नोंदविले.
‘अतिरेकी’, ‘दूसरा सामना’, ‘महापूर’ ‘बेगम बर्वे’, ‘महानिर्वाण’ यांसारख्या दर्जात्मक नाट्यलेखनशैलीच्या त्यांच्या कलाकृती मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरल्या. काळानुरूप बदलत्या परिस्थितीवर भाष्य करीत, त्या विषयांना गडदतेच्या विविधांगी शेड्स देत त्यातील आशयघनता प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे हे त्यांच्या लेखनशैलीचे वैशिष्ट्य. म्हणूनच त्यांच्या नाट्यकलाकृतींचे विषय हे आजच्या काळातही तितकेच सुसंगत वाटतात.
त्यांच्या ‘महापूर’ आणि ‘महानिर्वाण’ नाटकांनी देशाच्या सीमाच केवळ ओलांडल्या नाही, तर त्यांची काही नाटके अन्य भाषांमध्येही अनुवादित झाली आहेत. ननाटकाच्या बदलत्या प्रवाहाविषयी बोलताना ते म्हणाले, पूर्वी एक गाव- एक संस्कृती या पद्धतीमुळे नाटकांचा प्रेक्षकवर्ग विखुरला जात नव्हता, आता वेगवान जीवनशैली, पृथक जगणे, वाढलेली लोकसंख्या यामुळे नाटकांसाठी एकसंध असे वातावरण राहिलेले नाही. यातच विरंगुळ्यासाठी विविध पर्यायांची व्याप्तीही वाढलेली आहे. नाटक कुणासाठी करतो तर प्रेक्षकांसाठी. त्यामुळे नाटकांना गर्दी होणे आवश्यक आहे. लोकप्रिय नाटकांमुळेच प्रेक्षकांची पावले नाट्यगृहांकडे वळतात हेदेखील तितकेच खरे आहे.
पण आमच्या फळीनंतर संजय पवार, प्रमोद साठे, ईरावती कर्णिक, मनस्विनी लता रवींद्र यांसारख्या लेखकांची पिढी तयार झाली आहे.
पूर्वी सई परांजपे ही केवळ एकच महिला लेखिका होती, मात्र महिलाही नाट्यलेखनामध्ये उतरल्या आहेत, ही सकारात्मक बाब आहे. नाट्यलेखनात प्रयोग झालेले दिसत नसले तरी नाटकाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात खूप बदल झालेले आहेत.
दुसरीकडे देशातील विविध भागांमध्ये इतर नाटककारांनी जशी नाटकांची प्रतिसृष्टी निर्माण केली तसे धाडस महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीकडून झाले नसल्याची खंतही आळेकर व्यक्त करतात.

४ सध्या नाट्यलेखनापेक्षा ‘लघुकथा’ अधिक प्रगल्भ झालेल्या दिसतात. प्रशांत बागड, जयंत पवार यांसारख्या मंडळींनी लघुकथेला एक वेगळा आयाम दिला आहे. यामुळे नाटकांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी साहित्याचा फायदा झाला असल्याचे ते सांगतात. तसेच मराठी रंगभूमीवर जेवढे नवनवीन प्रयोग होताना दिसतात तेवढे इतर भाषिक रंगभूमीवर ते फारसे होताना दिसत नाहीत. म्हणूनच मराठी नाटकांचा दबदबा प्रादेशिक भाषांमध्ये आजही कायम असल्याचे स्पष्ट करीत मराठी नाटकांची प्रतिसृष्टी इतर ठिकाणी निर्माण करण्यात आपण कमी पडत असल्याची खंतही ते व्यक्त करतात.

४ ’महानिर्वाण’ नाटकात मृत्यूवर भाष्य करताना गांभीर्य आणि विनोदाचे मिश्रण सादर करण्यात आले होते. या विषयाकडे काहीशा तिरकस दृष्टिकोनातून पाहण्याचा तो प्रयत्न होता. यांसारख्या जुन्या नाटकांचे प्रयोग युवापिढीकडून पुनश्च झाल्यास निश्चितच आवडेल, असेही सतीश आळेकर म्हणाले.

Web Title: Suppression of Marathi drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.