सुपे : स्वच्छ भारत अभियानांतर्गत अकोला जिल्ह्यातून आलेल्या कमिटीने बारामती तालुक्यातील सुपे गावाची शुक्रवारी (दि. २७) पाहणी केली. या वेळी या कमिटीने शासकीय कार्यालये, पाणवठे तसेच वैयक्तिक व सामूहिक शौचालयांची पाहणी करून झालेल्या कामाचे समाधान व्यक्त केले. येथील ग्रामपंचायतीमध्ये या कमिटीचे मुख्य सदस्य स्वप्निल भड, के. बी. नेहरे यांच्यासह पंचायत समितीचे विस्ताराधिकारी डी. डी. खंडाळे, तालुका समन्वयक गोरख आटोळे, संतोष अवघडे यांनी भेट दिली. या वेळी येथील ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र आणि पशुवैद्यकीय दवाखाना आदी ठिकाणांच्या शौचालयांची पाहणी केली. तसेच सार्वजनिक पाणवठ्यांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. या वेळी येथील प्राथमिक शाळा क्र. १ मधील विद्यार्थ्यांना विचारलेल्या स्वच्छता संदेशाबाबतची उत्तरे मुलांनी तत्परतेने दिली. तसेच वैयक्तिक तसेच सामूहिक शौचालयासाठी ग्रामपंचायतीने केलेली जनजागृती आणि लोकहभागाबद्दल पदाधिकाऱ्यांचे विशेष कौतुक केले.या प्रसंगी येथील सरपंच दादा पाटील, स्वच्छता समिती अध्यक्ष संतोष लोणकर, नवनाथ जगताप, सदस्या रेखा हिरवे, मीरा तेली, सुनीता चव्हाण, शोभा सकट, संजय दरेकर, कुमार भोंडवे, रघुनाथ हिरवे, दामोदर गणेश खैरे, बबनराव वाघ, ग्रामविकास अधिकारी आर. के. चांदगुडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, या कमिटीच्या वतीने तालुक्यातील सुप्यासह जळगाव क. प., पानसरेवाडी, नारोळी आणि आंबी खुर्द आदी ठिकाणांची पाहणी केली असल्याची माहिती विस्तार अधिकारी खंडाळे यांनी दिली.(वार्ताहर)
स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुपे गावाची पाहणी
By admin | Updated: January 30, 2017 02:42 IST