निवडणुकीसाठी अंधश्रद्धेचा उतारा?
By Admin | Updated: July 7, 2015 04:12 IST2015-07-07T04:12:09+5:302015-07-07T04:12:09+5:30
निवडणुका कोणत्याही असो, त्यांचे बिगुल वाजले की, गावोगावी सुरू होते बुवाबाजी़ लिंबू-मिरचीचे उतारे़, गंडे़, नाडे व अजून बरेच काही. मळवलीनजीकच्या देवले गावचा सोमवारचा दिवस असाच काहीसा उजाडला़

निवडणुकीसाठी अंधश्रद्धेचा उतारा?
लोणावळा : निवडणुका कोणत्याही असो, त्यांचे बिगुल वाजले की, गावोगावी सुरू होते बुवाबाजी़ लिंबू-मिरचीचे उतारे़, गंडे़, नाडे व अजून बरेच काही. मळवलीनजीकच्या देवले गावचा सोमवारचा दिवस असाच काहीसा उजाडला़ प्रत्येक घराच्या दरवाजासमोर लिंबू व त्यावर गुलाल टाकलेला होता़ शेजारच्यांनी खोडसाळपणा केला असल्याच्या संशयावरून व भीतीपोटी शेजाऱ्या-पाजाऱ्यांमध्ये भांडणे झाली. नंतर कळले की, गावातील बहुतांश घरांच्या बाहेर हीच स्थिती आहे़ आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हा कुटिल डाव असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मग तर्क-वितर्क लढविले जाऊ लागले, हे काम नेमके कोणाचे?, यामागील खरा सूत्रधार कोण? कोणी सांगू लागले, गावात बुवा आला होता. होमहवन झाले. इतर बरेच काही विधी करण्यात आले. मात्र, या प्रकारामुळे गावात विशेषत: महिलावर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे़ महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा झाला. मात्र, नागरिकांच्या मनातील भीतीचे काय, हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा पुढे आला आहे़
पाटण गावात ४ आॅगस्ट रोजी ग्रामपंचायतीची निवडणूक आहे़ निवडणूक कार्यक्रम व आरक्षणे जाहीर झाल्यापासून गावांमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे़ यातूनच पॅनल व रात्र बैठका, गाव बैठका यांमुळे गावं रात्रन््रात्र जागत आहेत़ जमिनींचा पैसा मोठ्या प्रमाणात आल्याने युवकांमध्ये निवडणुकीची मोठी चुरस व ईर्षा निर्माण झाल्याने प्रस्थापितांचेदेखील धाबे दणाणले आहे़ या चढाओढीतूनच हा प्रकार घडला असून, नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करायचे व त्यातून राजकीय पोळी भाजण्याची ही क्लृप्ती असल्याचा संशय व्यक्त होत आहे़ लोहगड किल्ल्याच्या पायथ्याला डोंगराच्या कुशीमध्ये वसलेले पाटण गाव. बोरज व पाटण अशी ही ग्रुप ग्रामपंचायत असून, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असे प्रकार घडणे चिंताजनक आहे़ मोठ्या प्रमाणात हे उतारे पडल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे़ ग्रामस्थांनी या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांना याबाबत भेटून सविस्तर माहिती दिली आहे़ योग्य तो तपास करण्याचे आश्वासन निरीक्षक प्रदीप काळे यांनी ग्रामस्थांना दिले़(वार्ताहर)