कळस : इंदापूर तालुकयातील कळस येथील शर्कराकंदापासून इथेनॉलनिर्मिती करणारा हरणेश्वर अग्ॉ्रो हा प्रकल्प नऊ वर्षांपासून बंद आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हा कारखाना राजकारणाचा बळी ठरला आहे. आघाडी सरकारच्या काळात लालफितीचा फटका बसल्यामुळे डबघाईला आलेल्या या कारखान्याला युतीच्या राज्यातही अच्छे दिन आलेच नाहीत.कळस (ता. इंदापूर) येथील माळरानावर १९९९ भाजपाचे नेते बाबासाहेब चवरे यांनी आपल्या सहकार्याच्या साह्याने सुमारे २०९ एकर क्षेत्रावर या कारखान्याची भाजपा नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते पायाभरणी केली. पुढे २००५मध्ये सुरू झालेल्या या कारखान्यामधून शर्कराकंदापासून इथेनॉलनिर्मिती व उसापासून गूळ पावडरनिर्मिती करण्यास सुरवात झाली. उजनी जलाशयावरून यासाठी पाईपलाइन करून पाणीही आणण्यात आले. या ठिकाणी कामगारांसाठी वसाहतही उभी करण्यात आली. मात्र, राजकीय षड्यंत्र व प्रशासकीय उदासीनता यांमुळे उसापासून साखरनिर्मितीसाठी या कारखान्याला आघाडी सरकारच्या काळात अंतराची अट दाखवून परवाना नाकारण्यात आला. शर्कराकंदापासून इथेनॉलनिर्मिती व उसापासून गूळ पावडर, यावर कारखान्याची आर्थिक गणिते कोलमडली. त्यामुळे सुमारे १२ हजार सभासदांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी प्रकल्पासाठी आपली जमीन शेअररूपी मोबदल्यात कारखान्याला दिली. मात्र, २००९नंतर हा प्रकल्प गेली नऊ वर्षे बंदच आहे.
कळसचा हरणेश्वर अॅग्रो प्रकल्प बंदच
By admin | Updated: January 14, 2017 03:07 IST