२२ लाख टन कोट्यामुळे साखरदरात तेजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:23 IST2021-09-02T04:23:46+5:302021-09-02T04:23:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “ऑगस्ट महिन्याचा स्थानिक बाजारातील विक्रीसाठी दिलेला २१ लाख टनांचा कोटा व त्यानंतर सप्टेंबर ...

२२ लाख टन कोट्यामुळे साखरदरात तेजी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “ऑगस्ट महिन्याचा स्थानिक बाजारातील विक्रीसाठी दिलेला २१ लाख टनांचा कोटा व त्यानंतर सप्टेंबर महिन्यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेला २२ लाख टनांचा कोटा तसेच सणवारांचे दिवस, शिथिल झालेली टाळेबंदी या सर्वांचा परिपाक होऊन या साखरेच्या कारखानास्तरावरील दरात समाधानकारक वाढ झाली आहे,” असे आवाहन राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने केले आहे.
महासंघाने गेल्या पाच वर्षांतील ऑगस्ट, सप्टेंबरमधील प्रत्यक्ष साखरविक्रीची आकडेवारी वेळोवेळी सादर केल्याने अन्न मंत्रालयाकडून महिनानिहाय विक्री कोटे जाहीर झाले. यातून साखरेच्या दरात बऱ्यापैकी सुधारणा झाली. अजूनही हे दर साखरेच्या सरासरी उत्पादनखर्चाच्या तुलनेत अजून कमी आहेत. त्यात सुधारणा होण्यासाठी कारखान्यांनी बाजाराचा दैनंदिन आढावा घेऊन कोट्यातील साखरविक्री करणे योग्य राहील,” असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले.
नैसर्गिक आपत्तीमुळे जगात अव्वल असणाऱ्या ब्राझीलमधील साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या ३८४ लाख टनांवरून ३२५ लाख टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. जगातला दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार असणाऱ्या थायलंडमध्येही साखर उत्पादन कमी राहणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय साखर दरात आलेली तेजी टिकून आहे, असे दांडेगावकर म्हणाले. त्यांनी सांगितले, “चीन, इंडोनेशिया, बांगलादेश, दुबई, शारजा, श्रीलंका, कोरिया, मलेशिया, इराक, सोमालिया, सौदी अरेबिया, सुदान या देशांतील कच्च्या व पांढऱ्या साखरेची गरज नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान भागविण्याची संधी भारतासमोर आहे. ब्राझीलचा साखर हंगाम यंदा सप्टेंबर अखेरपर्यंत संपेल. थायलंडची साखर जानेवारीअखेर जागतिक बाजारात पोहोचेल. या संधीचा फायदा घेण्यासाठी कारखान्यांनी जास्तीत जास्त साखर निर्यात करावी.”
चौकट
४५ लाख टन जगात जास्त
“राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी असे प्रतिपादन केले की “आय.एस.ओ., एफ.ओ.लीच., डेटा ऍग्रो तसेच ग्लोबल फ्लॅट या संस्थांच्या जागतिक सर्वेक्षणानुसार २०२०-२१ मध्ये साखरेची उपलब्धता मागणीपेक्षा ४३ ते ४५ लाख टन कमी राहणार आहे. स्टोन एक्स, रोबो बँक व इतर विश्वासार्ह संस्थांकडून कच्च्या साखरेचा जागतिक साखर बाजार २० ते २१ सेंट्स प्रतिपाउंड (रु. ३१६८ ते रु.३३४० प्रतिक्विंटल एक्स मिल) राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.”
-प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय साखर महासंघ