अचानक चक्रे फिरल्याने रेश्मा भोसले भाजपामध्ये
By Admin | Updated: February 4, 2017 04:18 IST2017-02-04T04:18:35+5:302017-02-04T04:18:35+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग क्रमांक ७ मधून उमेदवारी नाकारल्याचे समजल्यानंतर शेवटच्या अर्ध्या तासात चक्रे फिरवून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांच्या

अचानक चक्रे फिरल्याने रेश्मा भोसले भाजपामध्ये
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग क्रमांक ७ मधून उमेदवारी नाकारल्याचे समजल्यानंतर शेवटच्या अर्ध्या तासात चक्रे फिरवून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी विद्यमान नगरसेविका रेश्मा भोसले यांनी भाजपाचे तिकीट मिळविले.
प्रभाग क्रमांक ७ मधील खुल्या गटात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भोसले आणि नीलेश निकम यांच्यात चुरस होती़ अजित पवार यांनी निकम यांच्या पारड्यात आपले वजन टाकले. हे समजताच भोसले समर्थकांनी पवार यांच्या जिजाई बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली़ तोपर्यंत निकम यांनी घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता़
भाजपाचे उमेदवार सतीश बहिरट यांनी पक्षाचा एबी फॉर्म घेऊन दुपारी साडेबाराच्या सुमारास अर्ज दाखल केला़ रेश्मा भोसले या दुपारी २ वाजून १० मिनिटांनी घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी आल्या़ त्या अपक्ष उमेदवारी दाखल करणार असल्याचे तेव्हा सांगण्यात आले़ मात्र, दरम्यानच्या काळात चक्रे फिरायला लागली होती. भोसले यांचे व्याही भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे त्यांच्या मदतीला धावून आले़ उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रांगेत असतानाच त्यांच्यापर्यंत भाजपाचा ए बी फॉर्म पोहोचविण्यात आला़
मनसेचे नगरसेवक राजू पवार हे भाजपामध्ये जाणार, अशी चर्चा सुरुवातीला काही दिवसांपासून सुरू होती़ शुक्रवारी सकाळी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे आपला नगरसेवकपदाचा राजीनामा दिला़ त्यानंतर शिवसेनेचा ए बी फॉर्म घेऊन दुपारी प्रभाग १४ मधून अर्ज दाखल केला़ (प्रतिनिधी)
आपल्याला याबाबत काहीही माहिती नाही़ त्यांनी असा निर्णय घेताना आपल्याकडे कोणतीही विचारणा केली नाही़
- अनिल भोसले, आमदार