अकरावी प्रवेशाचा सावळा गोंधळ

By Admin | Updated: September 3, 2015 03:22 IST2015-09-03T03:22:55+5:302015-09-03T03:22:55+5:30

आॅफलाईन पद्धतीने घेतलेला प्रवेश आॅनलाईन करून घेता येईल, कॉलेज बदलून मिळेल, घराजवळचे कॉलेज मिळू शकेल, एखाद्या नामांकित महाविद्यालयातील रिक्त जागेवर प्रवेश मिळाला तर

The sudden confusion of eleven entrances | अकरावी प्रवेशाचा सावळा गोंधळ

अकरावी प्रवेशाचा सावळा गोंधळ

पुणे : आॅफलाईन पद्धतीने घेतलेला प्रवेश आॅनलाईन करून घेता येईल, कॉलेज बदलून मिळेल, घराजवळचे कॉलेज मिळू शकेल, एखाद्या नामांकित महाविद्यालयातील रिक्त जागेवर प्रवेश मिळाला तर
मिळाला... असा विचार करून बुधवारी शाहू महाविद्यालयाच्या आवारात अकरावी प्रवेशासाठी सुमारे चार ते पाच हजार विद्यार्थ्यांनी गर्दी केली. परंतु, अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी झाल्याने पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यलायाने शाहू महाविद्यालयातील प्रवेशप्रक्रिया अचानक रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला.
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रांतील प्रवेशासाठी सहा फेऱ्या राबविण्यात आल्या. परंतु, तरीही ७५० हून अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे प्रवेशासाठी अर्ज केले. केवळ याच विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करून त्यांना शाहू महाविद्यालयात आॅनलाईन पद्धतीने प्रवेश दिले जातील, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आॅफलाईन पद्धतीने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी तसेच जुलै-आॅगस्टमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसह इतरही विद्यार्थ्यांनी सकाळी ९ वाजल्यापासूनच महाविद्यालयाच्या आवारात गर्दी केली.
(प्रतिनिधी)

आॅफलाईनची यादी मोठी
चिंचवड येथील गीतामाता कॉलेजने विद्यार्थ्यांना आॅफलाईन पद्धतीने प्रवेश दिले होते. त्यांचे प्रवेश आॅनलाईन पद्धतीने करण्यासाठी कॉलेजचे शिक्षक शाहू कॉलेजमध्ये दाखल झाले होते. मात्र, गुरुवारपासून महाविद्यालय स्तरावर प्रवेश होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. परिणामी, शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांची कागदपत्रे शाहू कॉलेजमध्येच जमा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आॅफलाईन पद्धतीने प्रवेश देणाऱ्या महाविद्यालयांची संख्या मोठी असल्याचे स्पष्ट झाले.

गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेण्यास पालक व विद्यार्थी तयार नव्हते. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ नियमाने प्रवेश द्यावा, असा आग्रह विद्यार्थी व पालकांनी धरला होता. विद्यार्थ्यांची समजूत काढून त्यांना नियमानुसार प्रवेश देण्याचे नियोजन शिक्षण उपसंचालक कार्यालसाला करता आले नाही. पोलिसांनाही अचानक झालेल्या गर्दीला आटोक्यात आणणे अवघड गेले. शाहू कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही या गर्दीत भर घातली.
सकाळी ९.३० वाजता गुणवत्ता यादीनुसार पहिल्या ५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार होते. मात्र, इतर विद्यार्थ्यांनीच सभागृहात गर्दी केली. या विद्यार्थ्यांना सभागृहाबाहेर काढणे व प्रवेशप्रक्रिया सुरू करणे अशक्य वाटत होते. शेवटी विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी शाहू कॉलेजमधील प्रवेशप्रकिया रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला.
जाधव यांच्यासह प्रवेश समितीती इतरही व्यक्ती प्रवेशप्रक्रिया थाबविण्यात आली असल्याची अनाउन्समेंट करीत होत्या. त्यात काही व्यक्ती गुरुवारपासून महाविद्यालय स्तरावर आॅफलाईन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जाईल, असे सांगत होत्या. तर, काही कालावधीनंतर महाविद्यालयांत आॅनलाईन पद्धतीने प्रवेश दिले जातील, असे जाहीर केले जात होते. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचा गोंधळ उडाला होता.

Web Title: The sudden confusion of eleven entrances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.