असा झाला रसिलाच्या खुनाचा उलगडा

By Admin | Updated: February 2, 2017 03:58 IST2017-02-02T03:58:36+5:302017-02-02T03:58:36+5:30

इन्फोसिस कंपनीतील आयटी अभियंता तरुणीचा खून करून पसार झालेल्या भाबेन भराली सैकिया या आरोपीला हिंजवडी पोलिसांनी अवघ्या आठ तासांत जेरबंद केले.

Such is the discovery of Rasila's murder | असा झाला रसिलाच्या खुनाचा उलगडा

असा झाला रसिलाच्या खुनाचा उलगडा

पिंपरी : इन्फोसिस कंपनीतील आयटी अभियंता तरुणीचा खून करून पसार झालेल्या भाबेन भराली सैकिया या आरोपीला हिंजवडी पोलिसांनी अवघ्या आठ तासांत जेरबंद केले. आसाम राज्यातील तखौमपूर जिल्ह्यात तातीबहार या मूळ गावी पळून जाण्यासाठी मुंबईत पोहोचलेल्या आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केली.
हिंजवडीतील इन्फोसिस कंपनीत नोकरीस असलेल्या रसिला राजू ओ.पी. (वय २३, रा. हिंजवडी, मूळ रा. केरळ) या तरुणीचा केबलने गळा आवळून खून झाल्याचा प्रकार रविवारी रात्री उघडकीस आला. खून करून पसार झालेल्या कंपनीच्या रखवालदार सैकिया याला हिंजवडी पोलिसांनी सोमवारी पहाटे ३च्या सुमारास मुंबईतून अटक केली.
एकटक बघत असल्याची कंपनी व्यवस्थापनाकडे तक्रार करणार, असे तरुणीने म्हटल्यामुळे चिडून रखवालदाराने रसिलाचा खून केला. खुनाची घटना सायंकाळी पाचला घडली. याची माहिती पोलिसांना रात्री दहाच्या सुमारास समजली. माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरॅतील फुटेज तपासले. त्यात रखवालदाराचा संशयास्पद वावर दिसून आला. पाच वाजता खून केल्यानंतर ड्यूटीची वेळ संपेपर्यंत सायंकाळी सातपर्यंत आरोपी कंपनीच्या आवारातच होता. ड्यूटी संपल्यानंतर तो निघून गेला.
सीसीटीव्हीत कैद झालेल्या फुटेजमधील काही दृश्यांचा आधार घेत पोलीस आरोपीजवळ पोहोचले. त्याला नाव, पत्ता विचारला असता, त्याने खोटे नाव सांगितले. उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्याला पोलिसी खाक्या दाखविण्यात आला. त्याने लगेच खुनाची कबुली दिली. त्याला घेऊन पोलीस पथक पुण्यात दाखल झाले.


न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. (प्रतिनिधी)

- रात्री साडेदहाला आरोपीच्या मागावर पोलीस पथक पाठविले. पुणे रेल्वे स्थानकावर अर्धा तास शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आरोपीच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता, तो मुंबईत असल्याचे निदर्शनास आले. तातडीने दुसरे पथक मुंबईला रवाना झाले. पुुणे ते मुंबई हे दीडशे किलोमीटर अंतर पोलिसांनी पावणेदोन तासांत पार केले. सव्वाबाराच्या सुमारास पोलीस पथक सीएसटी रेल्वे स्थानकाजवळ पोहोचले.
- आसामला निघून जाण्यासाठी रेल्वे पकडण्याकरिता आरोपी मुंबईत गेला होता. रात्री रेल्वे स्थानकावर संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या व्यक्तींची माहिती घेत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले.त्याला नाव, पत्ता विचारला असता, त्याने खोटे नाव सांगितले. तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्याला पोलिसी खाक्या दाखविण्यात आला. त्याने लगेच खुनाची कबुली दिली.

Web Title: Such is the discovery of Rasila's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.