सराफांचा बंद यशस्वी, ९५ टक्के कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:15 IST2021-08-24T04:15:50+5:302021-08-24T04:15:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रत्न आणि दागिने उद्योगावर ‘हॉलमार्किंग’ अनिवार्य केले आहे. मात्र, त्यात बऱ्याच जाचक अटी टाकल्या ...

सराफांचा बंद यशस्वी, ९५ टक्के कडकडीत बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रत्न आणि दागिने उद्योगावर ‘हॉलमार्किंग’ अनिवार्य केले आहे. मात्र, त्यात बऱ्याच जाचक अटी टाकल्या आहेत. भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) दागिन्यांच्या शुद्धतेच्या चार प्रमाणित शिक्क्यामध्ये अचानकपणे बदल केले आहेत. यात साधी चर्चा देखील केली नाही. याच्या निषेधार्थ राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनने पुण्यासह संपूर्ण राज्यात सोमवारी (दि. २३) पुकारलेला लाक्षणिक संप यशस्वी झाल्याचा दावा आहे.
संघटनेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी ९५ टक्के संप यशस्वी झाल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ज्वेलरी उद्योगाच्या शिखर संस्थांबरोबर सरकारने कोणतीही चर्चा केली नाही. आम्ही केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री पियुष गोयल यांना या संदर्भात पत्र पाठविले आहे. त्यांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. हॉलमार्कच्या काही अटी केवळ व्यापारीच नव्हे तर ग्राहकांसाठीही जाचक आहेत. यामुळे संपूर्ण व्यवसाय अडचणीत येऊ शकतो. त्यात बदल आवश्यक आहे.
कोट
“दोन दिवसांत केंद्र सरकार काय निर्णय घेते ते पाहणार आहोत. दीडशे जणांचे आमचे कृती दल स्थापन करण्यात आले आहे. या दलाची प्रत्यक्ष बैठक दोन दिवसांनंतर आयोजित केली जाईल. त्यात पुढील भूमिका निश्चित केली जाईल.”
- फत्तेचंद रांका, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन
कोट
“मराठवाड्यातील आठपैकी औरंगाबाद, लातूर आणि नांदेड येथे हॉलमार्क प्रमाणित करण्याची कार्यालये आहेत. इतर जिल्ह्यांत ही सुविधा नाही. यापूर्वी आम्हाला ‘हॉलमार्किंग’ला सहा तास लागायचे. आता चार-चार दिवस लागणार आहेत. तसेच आम्हाला दागिने त्यांच्याकडे जमा करावे लागतील. ग्राहक आणि सराफांच्या दृष्टीने ते जोखमीचे असल्याने ते शक्य नाही. त्यामुळे चार प्रमाणित शिक्क्यात केलेल्या बदलाला आमचा पूर्ण विरोध आहे.”
- सुधाकर टाक, सचिव, महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन