मेट्रोचे भुयार स्वारगेटहून लवकरच मंडईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:08 IST2021-06-17T04:08:17+5:302021-06-17T04:08:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: मेट्रोच्या भुयारी मार्गाचे स्वारगेटपासून सुरू झालेले काम आता मंडईच्या अलीकडे २०० मीटरपर्यंत पोहोचले आहे. येत्या ...

मेट्रोचे भुयार स्वारगेटहून लवकरच मंडईत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: मेट्रोच्या भुयारी मार्गाचे स्वारगेटपासून सुरू झालेले काम आता मंडईच्या अलीकडे २०० मीटरपर्यंत पोहोचले आहे. येत्या १५ दिवसांत हा बोगदा मंडईपर्यंत पूर्ण होईल. हा भुयारी मार्ग जमिनीपासून २८ मीटर खोल आहे.
शिवाजीनगर ते स्वारगेट असा हा ५ किलोमीटरचा भुयारी मार्ग आहे. जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्यांसाठी दोन स्वतंत्र बोगदे आहेत. स्वारगेट, मंडई, बुधवार पेठ, कसबा पेठ व शिवाजीनगर अशी ५ भुयारी स्थानके या मार्गात आहेत. प्रत्येक स्थानकात दोन्ही भुयारे एकत्र असणार आहेत. महामेट्रोच्या जनसंपर्क विभागाचे संचालक हेमंत सोनवणे यांनी ही माहिती दिली.
प्रकल्प विभागाचे संचालक अतुल गाडगीळ यांंनी सांगितले की, स्वारगेट ते मंडई भुयाराचे अंतर ११८० मीटर आहे. त्यापैकी १ हजार मीटरचे काम पूर्ण झाले आहे. राहिलेले १८० मीटरचे काम येत्या १५ दिवसांत पूर्ण होईल. हे भुयार एकेरीच आहे. ते पूर्ण झाले की मंडईपासून स्वारगेटकडे दुसऱ्या भुयाराचे काम सुरू होईल.
शिवाजीनगरपासून दोन्ही भुयारांचे काम आता मुठा नदीपात्र ओलांडून कसबा पेठेतील नियोजित भुयारी स्थानकाच्या जवळपास आले आहे. तिथून ते पुढे बुधवार पेठेकडे सुरू होईल. दोन्ही बाजूंची भुयारे मंडईत एकत्र येणार असून तिथेही आता भुयारी स्थानकाचे काम सुरू करण्यात येणार आहे.